World Head Neck Cancer Day: बसलेला आवाज, गिळण्यास त्रास ? कॅन्सरच्या या लक्षणांकडे नका करु दुर्लक्ष

| Updated on: Jul 27, 2022 | 12:06 PM

कर्करोग ( कॅन्सर) हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार ठरू शकतो. त्याचे अनेक प्रकार आहेत. साधरणत: ब्लड कॅन्सर ( रक्ताचा कर्करोग) , ब्रेस्ट कॅन्सर ( स्तनाचा कर्करोग), लंग कॅन्सर (फुप्फुसाचा कर्करोग) या बद्दल लोकांना माहिती असते. मात्र डोक आणि मान यांच्या कर्करोगाबद्दल ( head and neck cancer) लोकांमध्ये पुरेशी जाणीव नाही.

World Head Neck Cancer Day: बसलेला आवाज, गिळण्यास त्रास ? कॅन्सरच्या या लक्षणांकडे नका करु दुर्लक्ष
World Head Neck Cancer Day
Image Credit source: google
Follow us on

दरवर्षी 27 जुलै रोजी ‘वर्ल्ड हेड ॲंड नेक कॅन्सर डे ‘ (World Head and Neck Cancer Day) साजरा करण्यात येतो. डोक आणि मानेच्या कर्करोगात, तोंड ( Oral Cavity), जीभ, गाल, थायरॉईड, पॅरोटिड, टॉन्सिल्स, लेरिंक्स (Voice Box) हे भाग प्रभावित होऊ शकतात. भारतातील बहुसंख्य जनता या कर्करोगामुळे आजारी होऊ शकतात. नवी दिल्ली येथील फोर्टिस रुग्णालयातील सर्जिकल ऑन्कॉलॉजी विभागाचे युनिट हेड डॉ प्रतीक वार्ष्णेय यांच्या सांगण्यानुसार, तंबाखूचे सेवन, धूम्रपान, दारूचे सेवन आणि एचपीव्ही संक्रमण हे, या कर्करोगामागचे प्रमुख कारण आहे. या सर्व गोष्टी टाळणे सहज शक्य असल्याने, त्यामुळे होणाऱ्या कर्करोगापासूनही बचाव होऊ शकतो. त्यामुळे तंबाखू, दारूचे सेवन करणे तसेच धूम्रपान करणे टाळणे, हे आरोग्यासाठी हितकारक आहे.

कर्करोग होण्याची कारणे

जीवनशैली सुधारणे तसेच दारू, तंबाखू, धूम्रपान यासारख्या वाईट सवयींपासून दूर राहणे, हाच कर्करोगापासून वाचण्याचा प्रमुख उपाय आहे. या सर्व गोष्टींच्या दुष्परिणामांची तरुणांना जाणीव करून देणे अत्यंत गरजेचे आहे.

कर्करोगाची लक्षणे

स्क्रीनिंगच्या माध्यमातून पहिल्या स्टेजमधील कॅन्सरचे निदान होऊ शकते. कधीही भरून न निघणारी तोंडातील जखम वा अल्सर, बसलेला आवाज, अन्न-पाणी गिळण्यास होणारा त्रास, चेहरा किंवा मानेमध्ये असलेली एखादी गाठ किंवा सूज हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांना दाखवावे. या लक्षणांची तपासणी ऑन्कॉलॉजीस्ट कडून करून घ्यावी. कर्करोग झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी ज्या भागात अल्सन झाला असेल किंवा सूज आली असेल, त्याची बायॉप्सी (Biopsy) केली जाते. निदान झाल्यानंतर कॅन्सर कुठल्या स्टेजला आहे, त्यानुसार, अल्‍ट्रासोनोग्राफी, सीटी/एमआरआय आणि सीटी स्कॅनचा सल्ला दिला जातो.

हे सुद्धा वाचा

कर्करोगापासून वाचण्याचे उपाय

यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करणे गरजेचे आहे. कर्करोग म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती, उपाय काय, याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. तंबाखूमुक्ती हा कॅन्सरपासून वाचण्याच्या लढ्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. तरुणांनी तंबाखूपासून लांब रहावे, यासाठी त्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणीव करुन दिली पाहिजे. एचपीव्ही वॅक्सीनेशन ( लसीकरण) हा विषाणूद्वारे होणाऱ्या कॅन्सरपासून वाचण्याचा आणखी एक उपाय आहे. डोकं वा मानेच्या कॅन्सरचे सुरुवातीच्या स्टेजमध्येच निदान झाल्यास तज्ज्ञांच्या मदतीने त्यावर चांगले उपचार करता येतात.

कर्करोगावरील उपचार

सुरुवातीच्या स्टेजमध्ये याप्रकारच्या कॅन्सरला रोखण्यासाठी शस्त्रक्रिया हा उपाय असतो. मात्र कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजला असेल तर शस्त्रक्रियेशिवाय रेडिओथेरपी आणि केमोथेरपीची आवश्यकता असते. या क्षेत्रांत आता बरीच प्रगती झाली असून त्यामुळे (रेडिओथेरपी आणि केमोथेरपीची) होणाऱ्या दुष्परिणांमाची ( Side Effects) तीव्रता बरीच कमी झाली आहे.

तंबाखू- मद्यपान , धूम्रपान टाळा

हेड ॲंड नेक कॅन्सर पासून ( Head and Neck Cancer) बचाव सहज शक्य आहे. आणि त्यावर उपचार करून त्यातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. मात्र कॅन्सरची ही नामुष्की टाळणेच कधीही चांगले. तंबाखू, मद्यपान, धूम्रपान यासारख्या शरीरासाठी घातक सवयींपासून लांब रहा. निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. कॅन्सरची कोणतीही लक्षणे आढळल्यास वेळ न घालवता, डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित चाचणी करून घ्यावी.

( टीप – या लेखात सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. )