पाकिस्तानच्या अबोटाबाद येथून ३२ हजार पासपोर्ट गायब, अतिरेक्यांच्या हाती तर लागले नाहीत ना !

पाकिस्तानमध्ये ज्या एबटाबाद येथे अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याची हत्या झाली त्या अतिरेक्यांच्या केंद्रातून ३२ हजार पासपोर्ट चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पाकिस्तानच्या अबोटाबाद येथून ३२ हजार पासपोर्ट गायब, अतिरेक्यांच्या हाती तर लागले नाहीत ना !
| Updated on: Sep 18, 2025 | 5:25 PM

पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर पासपोर्ट चोरीचे प्रकरण समोर आले आहे. अतिरेकी गड असलेला अबोटाबाद येथून ३२ हजार पासपोर्ट गायब झाले आहेत. हा खुलासा पाकिस्तानच्या लोक लेखा समितीच्या अहवालातून झाला आहे. या अहवालानुसार गायब पासपोर्ट संदर्भात त्यांना ब्लॉक केलेले नाही आणि पाकिस्तान सरकारची काही कारवाई करण्याची इच्छाही दिसत नाही.

डेली टाईम्सच्या मते बुधवारी पाकिस्तानच्या लोक लेखा समितीचे अध्यक्ष तारिक फजल चौधरी यांची एक बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानचे पासपोर्ट महासंचालक मुस्तफा काझी यांनी पाचारण केले होते. काझी यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून पासपोर्ट चोरीच्या घटना घडल्या आहेत.

अबोटाबाद हा अतिरेक्यांचा गड मानला जातो

अबोटाबादला पाकिस्तानचा अतिरेकी गड म्हटले जाते. २०११ मध्ये अमेरिकन फोर्सने येथेच अमेरिकेवर ९/११ चा हल्ला करणारा क्रूर दहशतवादी अल कायदा संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याची हत्या केली होती. अबोटाबाद हे खैबर पख्तूनख्वाचे एक शहर आहे. खैबर सध्या अतिरेक्यांच्या हालचालीने प्रभावित आहे. अशात अबोटाबाद येथून ३२ हजार पासपोर्ट गायब झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पाकिस्तानमधून कोणी गायब केले पासपोर्ट?

पाकच्या लोक लेखा समितीच्या बैठकीत फझल चौधरी यांनी हा प्रश्न पासपोर्ट महासंचालकांना केला तेव्हा त्यांनी नीट उत्तरे दिली नाहीत. या प्रकरणात सखोल चौकशी का झाली नाही यावरुन समितीने नाराज झाली आहे. या पासपोर्टचा कुठे-कुठे दुरुपयोग होत आहे या संदर्भात कोणालाही कल्पना नसल्याचे समितीने म्हटले आहे.

लोक लेखा समितीने लागलीच पाकिस्तान सरकारला सर्व पासपोर्ट प्रक्रीय ऑनलाईन करण्याचे आदेश दिले. समितीने हा सर्व चिंताजनक प्रकार असून याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अतिरेक्यांच्या हाती तर लागले नाहीत ना ?

पाकिस्तानात सध्या तहरीक ए तालिबान, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद, एचएम, इसिसचे अतिरेकी गट सक्रीय आहेत.
एकट्या टीटीपीजवळ ६००० अतिरेकी आहेत. या अतिरेक्यांजवळ हे पासपोर्ट गेले तर नाहीत ना अशा सवाल केला जात आहे.

पाकिस्तानवर आधी ही बनावट पासपोर्टद्वारा अतिरेक्यांना पाठवण्याचा आरोप होत आला आहे. अशात यावेळी देखील हे पासपोर्ट अतिरेक्यांच्या हाती तर लागले नाहीत ना ? असा सवाल केला जात आहे.