
प्रामाणिकपणा (Honesty) हा अंगातील गुण असला तरी तो सरसकट सर्वांमध्ये क्वचितच दिसून येत असतो. तात्पुरत्या फायद्यासाठी अनेक लोक प्रामाणिकपणाचा गाशा गुंडाळून ठेवत आपले हेतू साध्य करीत असतात. परंतु याला काही जण अपवाददेखील ठरत असतात. अशांच्या प्रामाणिकपणाची दखल नक्कीच घेतली जात असते. याचेच एक उदाहरण सध्या जगासमोर आले आहे. आफ्रिकन देशातील एका मुलाच्या प्रामाणिकपणाचे उदाहरण सध्या जगभरात (Worldwide) दिले जात आहे. प्रत्यक्षात त्याला रस्त्याच्या कडेला सुमारे 38 लाख रुपये पडलेले आढळले. त्याने ते पैसे त्याच्याकडे ठेवण्याऐवजी त्याच्या मालकाला दिले. मुलाचा प्रामाणिकपणा पाहून मालकाने त्याला बक्षीसही दिले. तर दुसरीकडे खुद्द देशाच्या राष्ट्रपतींनी (President) त्याला 8 लाख रुपये अन् देशातील सर्वात प्रतिष्ठित शाळेत प्रवेशही मिळवून दिला आहे.
या प्रामाणिकपणामुळे एका अमेरिकन कॉलेजने त्यांना पदवी शिक्षणासाठी पूर्ण शिष्यवृत्ती देऊ केली आहे. ‘बीबीसी’च्या रिपोर्टनुसार, इमॅन्युएल टुलो असे या 19 वर्षीय मुलाचे नाव आहे. तो मूळचा पश्चिम आफ्रिकी देश लायबेरियाचा असून तो मोटारसायकल टॅक्सी चालक म्हणून काम करायचा. मात्र त्यातून त्यांचा दैनंदिन खर्च भागत नव्हता. एके दिवशी त्याला रस्त्याच्या कडेला लायबेरियन आणि अमेरिकन नोटांनी भरलेली बॅग दिसली. त्यात सुमारे 38 लाख रुपये होते. त्याने हे पैसे आपल्या मालकाला दिले आणि सांगितले की जर कोणी सरकारी रेडिओवर या पैशासाठी आवाहन केले तर त्याला हे पैसे देण्यात येतील. लोक इमॅन्युएलच्या प्रामाणिकपणाची चेष्टा करून तू गरिबीतच मरणार असे हिनवू लागले. परंतु तो त्याच्या प्रामाणिकपणावर ठाम राहिला. याचा फायदा झाला त्याला त्याच्या प्रामाणिकपणाची पावती मिळाली.
इमॅन्युएलला लायबेरियातील सर्वात प्रतिष्ठित ‘स्कूल रिस्क इंस्टीट्यूट’मध्ये प्रवेश मिळाला. अध्यक्ष जॉर्ज व्हिया यांनी इमॅन्युएलला सुमारे 8 लाख रुपये दिले. एका स्थानिक मीडिया मालकाने त्याला जनतेकडून मिळालेले पैसेही दिले.
इमॅन्युएलला ज्या व्यक्तीचे पैसे मिळाले होते, त्याने त्या मुलाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची वस्तूही दिली.
याशिवाय अमेरिकेतील एका महाविद्यालयाने त्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्ण शिष्यवृत्ती देण्याची ऑफर दिली आहे. दरम्यान, बहुतेक लायबेरियन मुलांना गरीबीमुळे शाळा सोडून उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करावे लागत असते. वडील वारल्याने इमॅन्युएलला त्याच्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर वयाच्या 9 व्या वर्षी शाळा सोडावी लागली. तो आपल्या मावशीकडे रहात होतेा. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी त्याने कमाईचे साधनही शोधण्यास सुरुवात केली. नंतर टॅक्सी चालवून काही पैसे कमावू लागला होता.
दरम्यान, रस्त्याच्या कडेला त्याला पैशांची बॅग सापडली. परंतु याच बॅगने आज त्याचे आयुष्य बदलून टाकले आहे.
तो पुन्हा शाळेत जाण्यासाठी तयार झाला आहे. तो अनेक वर्षांपासून अभ्यासापासून दूर गेल्याने त्याचे शिक्षकही इमॅन्युएलला अभ्यासात मदत करत आहेत. त्याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याला 6 वर्षे लागतील. आणि वयाच्या 25 व्या वर्षी तो पदवीधर होईल. इमॅन्युएल म्हणाला, की तो विद्यापीठात अकाउंटिंगचा अभ्यास करणार आहे. जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था हाताळण्यात तो हातभार लावू शकेल.
संबंधित बातम्या
Delhi CCTV | ‘मॉर्निंग वॉक’ला निघालेल्या दोघांना अडवलं, भररस्त्यात लुटीचा थरार
Emotional video : एकदा तरी पप्पा तुम्ही या हो सणाला…; कवितेतून पोलिसानं मांडली व्यथा, ऐका