‘काश्मीरमधील मोठी समस्या संपली’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी कलम 370 वर मोदी सरकारचे केले कौतूक

काश्मीरसाठी घटनेत कलम 370 ची तरतूद होती. या कलमामुळे काश्मीर भारतापासून वेगळे असल्याची भावना निर्माण होत होती. परंतु आताक कलम 370 रद्द करण्यात आल्यामुळे या समस्येचा शेवट झाला.

काश्मीरमधील मोठी समस्या संपली, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी कलम 370 वर मोदी सरकारचे केले कौतूक
salman khurshid
| Updated on: May 30, 2025 | 12:37 PM

ऑपरेशन सिंदूरनंतर खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांमध्ये गेले आहे. या शिष्टमंडळातील खासदार पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना दिली जाणारी मदत याबाबत जगभरात माहिती देत आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत. यावेळी इंडोनेशियामध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, कलम 370 मुळे काश्मीर भारतापासून वेगळे असण्याची भावना होती. केंद्र सरकारकडून हे कलम रद्द केल्यानंतर ही भावना संपली. मूळ समस्याच नष्ट झाली.

सलमान खुर्शीद यांनी काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर अनेक सकारात्मक बदल झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, काश्मीरमधील कलम 370 रद्द झाल्यानंतर निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये 65 टक्के मतदारांनी सहभाग घेतला. आता काश्मीरमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार आहे. काश्मीरचा विकास झाला आहे. काश्मीरमध्ये समृद्धी आली आहे.

काश्मीरवर काय म्हणाले खुर्शीद ?

सलमान खुर्शीद म्हणाले, काश्मीरमध्ये दीर्घकाळापासून एक समस्या होती. त्या समस्याचा मोठा भाग राज्यघटनेतील कलम 370 होते. या कलमामुळे काश्मीर भारतापासून वेगळे असल्याची भावना होत होती. मग कलम 370 रद्द करण्यात आले आणि या समस्याचे शेवट झाला. इंडिनेशियामधील थिंक टँक आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांसोबत बोलताना खुर्शीद यांनी ही भूमिका मांडली.

माजी परराष्ट्रमंत्री आणि जनता दल (यू) चे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ विविध देशांच्या दौऱ्यावर आहेत. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूर या देशांचा दौरा करणार आहे. त्या देशातील परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्या लोकांसोबत ते चर्चा करणार आहे. ऑपरेशन सिंदूरसोबत देशाच्या सुरक्षासंदर्भातील प्रश्नांवर या शिष्टमंडळाकडून माहिती देण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात सरकारने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सत्तेची सूत्र हाती घेतली. त्यानंतर या सरकारने कलम 370 पुन्हा बहाल करण्याचा प्रस्ताव समंत केला होता. भाजपकडून या प्रस्तावाचा विरोध करण्यात आला. इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी कलम 370 पुन्हा येणार नाही, असा दावा भाजपने केला होता. सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्य असल्याचा निकाल दिला. त्यानंतर काँग्रेसनेही हा प्रश्न आता बंद झाल्याचे म्हटले.