
सध्या पाकिस्तान युद्धाच्या भितीखाली वावरत आहे. भारताकडून कधी, कुठल्या क्षणी हल्ला होईल हीच भिती त्यांच्या मनात आहे. पाकिस्तानी नेते वारंवार युद्धाची शक्यता व्यक्त करत आहेत. शस्त्रास्त्रांच्या क्षमतेबद्दल बोलायच झाल्यास भारत पाकिस्तानच्या बराच पुढे आहे. आपण भारताविरोधात युद्ध जिंकू शकत नाही, हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे काहीही करुन हे संकट टळावं असा त्यांचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य पाकिस्तानी भारताकडे कुठली शस्त्रास्त्र आहेत? या विषयी गुगलवर सर्च करत आहेत. सध्या निर्माण झालेल्या या सगळ्या स्थितीला पाकिस्तान जबाबदार आहे. 22 एप्रिलला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला. 26 निरपराध पर्यटकांची निर्घृण हत्या केली. काहीही करुन भारत या हल्ल्याचा बदला घेणार, हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना माहित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची भारताविरोधात आरडाओरड सुरु आहे.
माजी पाकिस्तानी सैनिक आदिल राजा यांनी दावा केला की, हा हल्ला पाकिस्ताने लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या इशाऱ्यावरुन झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा मलिन झाली आहे. सद्य स्थितीत पाकिस्तानी नागरिक गुगलवर भारताच्या एका खास अस्त्राविषयी सर्च करत आहेत.
पाकिस्तानी गुगलवर कुठल्या शस्त्राबद्दल सर्च करतायत?
इंडियन एअर फोर्सच्या राफेल फायटर जेट्सनी पाकिस्तानात दहशत निर्माण केली आहे. पाकिस्तानी मीडिया आणि जनतेमध्ये राफेलच्या ताकदीविषयी चर्चा सुरु आहेत. पाकिस्तानी लोक गुगलवर भारताची सैन्य शक्ती, राफेलची मारक क्षमता आणि युद्धाची शक्यता या विषयी सर्च करत आहेत. सर्वसामान्य पाकिस्तानी राफेल विषयी सर्वाधिक सर्च करत आहेत.
मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद
पाकिस्तानी सैन्याचे जनरल आणि मीडियाकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे तिथे भिती अधिक वाढली आहे. पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांनी 29 एप्रिलला मध्यरात्री 2 वाजता एक पत्रकार परिषद घेऊन दावा केला की, गोपनीय माहितीनुसार, भारत पुढच्या 24 ते 36 तासात हल्ला करु शकतो. या वक्तव्यामुळे पाकिस्तानात भिती निर्माण झाली. #MunirOut या हॅशटॅगचा ट्रेंड सुरु झाला.