सिंधू जलकरार स्थगितीनंतर पाकिस्तानात गंभीर जलसंकट, धरणातील पाणी मृतसाठ्यांवर, कापूस उत्पादन 30% घटले

पाकिस्तानात शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचे संकट आले आहे. पाकिस्तान वारंवार भारताला सिंधू जल करार सुरु करण्याची विनंती करत आहे. त्यासाठी पाकिस्तानकडून चार पत्रही भारताला पाठवली गेली आहे.

सिंधू जलकरार स्थगितीनंतर पाकिस्तानात गंभीर जलसंकट, धरणातील पाणी मृतसाठ्यांवर, कापूस उत्पादन 30% घटले
पाकिस्तानमधील बगलिहार जलविद्युत परियोजनेचे दृश्य
| Updated on: Jun 12, 2025 | 2:05 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पाऊले उचलली. त्यात सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्याचे परिणाम आता पाकिस्तानला जाणवू लागले आहे. पाकिस्तानात गंभीर जलसंकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानमधील इंडस रिव्हर सिस्टम अथॉरिटीने (सिंधू नदी प्रणाली प्राधिकरण) सांगितले की, जितके पाणी मिळाले, त्यापेक्षा 11,180 क्यूसेक पाणी जास्त सोडले गेले आहे. पाकिस्तानमधील दोन प्रमुख जलाशय म्हणजे सिंधू नदीवरील तरबेला आणि झेलम नदीवरील मंगला येथील जलस्तर मृतसाठ्यावर आले आहे. त्यामुळे सिंचनाबरोबर पिण्याचा पाण्यासाठी गंभीर संकट निर्माण झाले आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गंभीर संकट निर्माण झाले आहे. मागील वर्षी या भागातील शेतकऱ्यांना 1.43 लाख क्यूसेक पाणी मिळाले होते. त्यातुलनेत यावर्षी 1.14 लाख क्यूसेक पाणी मिळाले आहे. त्यात 20 टक्के घसरण आहे. यामुळे पाकिस्तानचे कृषी क्षेत्र गंभीर जलसंकट आले आहे. सर्वच महत्वाच्या पिकांच्या उत्पादनात 13 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. कापसाचे उत्पादन 30 टक्के घसरले आहे. गव्हाच्या उत्पादनात 9 टक्के घट झाली आहे. मकाचे उत्पादन यंदा 15 टक्के कमी झाले आहे. पाकिस्तानचे सकल कृषी उत्पादन मागील वर्षी 24.03 टक्के होते. त्यात यंदा 23.54 घट झाली आहे.

पाकिस्तानात मान्सून अजून दाखल झाला नाही. त्यातच शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचे संकट आले आहे. पाकिस्तान वारंवार भारताला सिंधू जल करार सुरु करण्याची विनंती करत आहे. त्यासाठी पाकिस्तानकडून चार पत्रही भारताला पाठवली गेली आहे. परंतु भारताने ठाम भूमिका घेतली आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, दहशतवाद संपवल्याशिवाय पाकिस्तानसोबत चर्चा नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानने 1960 मधील जलकरारासाठी मध्यस्था करण्याचे आवाहन जागतिक बँकेलाही केले आहे. परंतु जागतिक बँकेने मध्यस्था करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, भारत आपल्या पाणी अडवण्याचा पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचे काम करत आहे. गंगा, सिंधू, यमूना नदी जोडणाऱ्या योजनेवर काम करत आहे. पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी 26 पर्यंटकांची हत्या पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी केली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई करत सिंधू जल करार स्थगित केला होता.