US Attack On Kharg Island : युद्धातला टर्निंग पॉइंट, भारतासाठी अत्यंत वाईट बातमी, खार्ग आयलँडवरील हल्ल्याचे काय परिणाम होणार?

US Attack On Kharg Island : मध्य पूर्वेत सुरु झालेल्या युद्धाला दोन आठवडे पूर्ण होत असताना अमेरिका-इस्रायलने आज मोठ पाऊल उचललं आहे. अमेरिकेने थेट इराणच्या खार्ग आयलँडवर हल्ला केला आहे. याचे भारतासह जगावर उलटे परिणाम सुद्धा होऊ शकतात.

US Attack On Kharg Island : युद्धातला टर्निंग पॉइंट, भारतासाठी अत्यंत वाईट बातमी, खार्ग आयलँडवरील हल्ल्याचे काय परिणाम होणार?
iran kharg island
Image Credit source: Getty
| Updated on: Mar 14, 2026 | 9:59 AM

फारसच्या खाडीत शांत दिसणाऱ्या निळ्याशार समुद्रात एक छोटसं बेट आहे, खार्ग आयलँड. आकाराने हे बेट इतकं छोटं आहे की, पहिल्या नजरेत नकाशावर हे बेट सहज दिसत नाही. आज हे छोट्ंस बेट जागतिक राजकारण, ऊर्जा बाजार आणि सैन्य रणनितीच्या टप्प्यात आलं आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याने खार्ग आयलँडवर सर्वात मोठा सैन्य हल्ला केल्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानुसार मध्य पूर्वेच्या इतिहासातील हा सर्वात शक्तीशाली बॉम्ब हल्ला आहे. या हल्ल्यात खार्ग आयलँडवरील इराणचे सर्व सैन्य तळ नष्ट झाले आहेत. अमेरिका-इस्रायलचा खार्ग आयलँडवरील हल्ला हे युद्धातील सर्वात मोठं पाऊल आहे. अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प यांनी खार्ग आयलँडला इराणी शासनाचं क्राउन ज्वेल म्हणजे सर्वात किंमती संपत्ती म्हटलं. त्यावरुन या बेटाचं महत्व लक्षात येतं.

खार्ग आयलँडवर हल्ला केला असला तरी जाणूनबुजून तेल सुविधांना टार्गेट केलेलं नाही असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. खार्ग आयलँडवरील या हल्ल्याचा अर्थ काय? त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते समजून घ्या. खार्ग आयलँड हे इराणचं सर्वात महत्वाचं तेल निर्यात केंद्र आहे. या बेटावरच्या तेल सुविधा नष्ट झाल्या, तर इराणची सर्व अर्थव्यवस्था ठप्प होऊन जाईल. हे बेट इराणचं मुख्य तेल निर्यात टर्मिनल आहे. इथे दररोज 70 लाख बॅरल तेल लोड केलं जाऊ शकतं. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्या दाव्यानुसार अमेरिकन जेट्सनी फक्त तिथल्या सैन्य तळांना लक्ष्य केलय. तेल प्रकल्पाला हात लावलेला नाही. हा इराणसाठी एक इशारा आहे. कारण त्यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करुन ठेवलय.

अमेरिकेने खार्ग आयलँडवर हवाई हल्ला का केला?

स्ट्रेट ऑफ होर्मुझ अजून काही दिवस बंद राहिल्यास जागतिक तेल संकट निर्माण होईल. इराणकडे स्ट्रेट ऑफ होर्मुझ हाच सध्याच्या घडीला बचावाचा एकमेव मार्ग आहे. तोच मार्ग उघडावा यासाठी अमेरिकेने खार्ग आयलँडवर हवाई हल्ला केला. पण तेल सुविधांना हात लावलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

भारताला धोका काय?

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्याला इराणचं ‘क्राउन ज्वेल’ म्हणतात, अशा ठिकाणी त्यांनी हल्ला केलाय. मग, उद्या इराणने यावर प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला, तर जगासह भारतासमोर मोठ तेल, एलपीजीच संकट येऊ शकतं. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक करणाऱ्या प्रत्येक जहाजाला इराणने लक्ष्य केलं तर इथून एकही जहाज जाणार नाही. आता इराणने भारताच्या काही तेल जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून येण्याची परवानगी दिली आहे. पण यापुढे ते परवानगी देणार नाहीत तसच इराणकडून सौदी अरेबिया, बहरीन, कुवैत, कतार, ओमान येथील तेल प्रकल्पांवरील हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. बदला म्हणून त्यांनी आखाती देशातील तेल प्रकल्पांवर हल्ले केले तर सगळी तेल निर्मितीच ठप्प होईल. इराण असं करु शकतो. कारण त्यांनी मागच्या 15 दिवसात हेच केलय. त्यामुळे अमेरिका-इस्रायलने उचलेलं हे पाऊल जगावर उलटू शकतं.

Follow Us