
इराण आणि इस्त्रायल युद्धात थेट अमेरिकासुद्धा उतरली आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर जागतिक परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अमेरिकेच्या या पावलामुळे तिसरे महायुद्ध होण्याची भीती आहे. जगातील इतर देशसुद्धा या युद्धात ओढले जाण्याची शक्यता आहे. या युद्धात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापेक्षा जास्त विनाश होईल, अशी भीती आहे. इस्रायलचे म्हणणे ऐकून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध करण्याचा आणि इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला करण्याचा निर्णय कधी घेतला? अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याचे नियोजन कसे केले? काय आहे ती इनसाइड स्टोरी…
अगदी ६ दिवसांपूर्वी १७ जून २०२५ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध करण्याचा आणि इराणी अणुकेंद्रांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता. या दिवशी अमेरिकेचे ऑपरेशन इराणी अणू मोहीम विरोधात कारवाई सुरू केली. १७ जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी-७ बैठक अर्ध्यावरच सोडून अचानक कॅनडाहून अमेरिकेत परतले. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदी होणार नाही, परंतु काहीतरी मोठे घडणार आहे.
कॅनडामधून डोनाल्ड ट्रम्प वॉशिंग्टन डीसीमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी व्हाईट हाऊसमधील सिच्युएशन रूम उघडण्याचे आदेश दिले. तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेलाही सिच्युएशन रूममध्ये पोहोचण्याचे आदेश दिले. त्या दिवसापासून इराणच्या अणू प्रकल्पांवर हल्ल्याची योजना सुरू झाली. पाच दिवस ही प्लॅनिंग सुरु होती. अमेरिकेने मध्य पूर्व भागात बॉम्बर्स, लढाऊ विमाने, युद्धनौका आणि विमानवाहू जहाजांची तैनाती वाढवली. त्या ठिकाणी असलेल्या सैनिक तळांवर सुरक्षा वाढवली.
अमेरिकेच्या पाच दिवसांच्या प्लॅनिंगनंतर २१ जून रोजी रात्री अमेरिकन बॉम्बर आणि सबमरीनने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हल्ला केला. या प्लॅनिंगची कल्पना इस्त्रायलला सुद्धा नव्हती. अमेरिकेने इस्त्रायलला इराणवरील हल्ल्याची माहिती हल्ला करण्याच्या काही वेळेपूर्वी दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष जेडी व्हान्स, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ, जॉइंट चीफ्सचे अध्यक्ष डॅन केन, सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, सीडीएस सुसी विल्स आणि व्हाईट हाऊसचे सल्लागार डेव्हिड वॉरिंग्टन यांनी या प्लॅनिंगमध्ये महत्वाची भूमिका बजावली. डोनाल्ड ट्रम्प कॅनडावरुन परत आल्यानंतर अमेरिका युद्धात उतरणार असल्याची शक्यता वाढली. एबीसीच्या रिपोर्टनुसार, इराणच्या एटमी सेंटरवर जो हल्ला झाला, त्याचा अभ्यास अमेरिका आणि इस्त्रायल सैन्याने वर्षभरापूर्वी केला होता. थोडक्यात इराणी एटमी मिशन संपवण्याची तयारी खूप पूर्वीच झाली होती.