
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निर्मित टॅरिफ संकटामुळे सध्या जगातील अनेक देश हैराण झाले आहेत. टॅरिफचा थेट फटका नोकऱ्या आणि अर्थव्यवस्थेला बसत आहे. टॅरिफमुळे सर्वात मोठ संकट भारतासमोर उभं राहिलं आहे. भारतातून अमेरिकेत 20 टक्के सामानाची निर्यात होते. पण ट्रम्प यांनी आता भारतीय सामनावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे अमेरिकन बाजारपेठेत भारतीय सामान महागलं असून परिणाम ग्राहक त्यापासून दुरावणार आहे. टॅरिफबद्दलची आपली भूमिका किती योग्य आहे हे जगाला पटवून देण्याच्या नादात डोनाल्ड ट्रम्प यांना मायदेशातच अमेरिकी अपीलीय कोर्टाकडून सोमवारी मोठा झटका बसला. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना फेडरल रिजर्वच्या गर्व्हनर लीसा कुक यांना पदावरुन हटवायचं आहे. पण अपीलीय कोर्टाने ट्रम्प यांना असं करण्यास परवानगी देण्यास नकार दिला आहे.
म्हणजे त्यांना लीसा कुक यांना पदावरुन हटवता येणार नाही. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मंगळवारी-बुधवारी होणाऱ्या फेडच्या निती बैठकीत लीसा कुक सहभागी होऊ शकतात. या बैठकीत अमेरिकी व्याजदरात कपातीचा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेत 1913 साली केंद्रीय बँकेची स्थापना झाली. पहिल्यांदाच कुठल्या राष्ट्राध्यक्षाने थेट गव्हर्नरला पदावरुन हटवण्याचा प्रयत्न केला आहे.
सुप्रीम कोर्टात आव्हान देणार
वॉशिंगटन डीसी सर्किट कोर्ट ऑफ अपील्सने जस्टिस डिपार्टमेंटच अपील फेटाळून लावलं. जस्टिस डिपार्टमेंटने ट्रम्प यांना कुक यांना पदावरुन हटवण्याची अस्थायी अनुमती देण्याची मागणी केली होती. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जिया कोब यांनी 9 सप्टेंबरला रोजी एक आदेश दिला. त्यानुसार त्यांनी ट्रम्प यांना लीसा कुकना पदावरुन हटवण्यापासून रोखलं होतं. ट्रम्प प्रशासन आता या निर्णयाला अमेरिकी सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची तयारी करत आहे.
असा प्रयत्न करणारे डोनाल्ड ट्रम्प पहिले राष्ट्राध्यक्ष
न्यायालयाने 2-1 ने निर्णय दिलाय. यात सर्किट जज ब्रॅडली गार्सिया आणि जे. मिशेल चाइल्ड्स बहुमतात होते. दोघांनी माजी राष्ट्रपती जो बायडेन यांना नियुक्त केलं होतं. ट्रम्प यांनी नियुक्त केलेले सर्किट जज ग्रेगरी कॅटसस यांनी असहमती दर्शवली. फेडला राजकीय हस्तक्षेपापासून वाचवण्यासाठी स्थापनेच्यावेळीच काँग्रेसने काही तरतुदी केल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रपती गव्हर्नरला केवळ कारणाच्या आधारावर हटवू शकतात. पण कारणाची परिभाषा किंवा हटवण्याची प्रक्रिया स्पष्ट नाहीय. आतापर्यंत कुठल्याही राष्ट्राध्यक्षाने फेड गव्हर्नरला हटवण्याचा प्रयत्न केला नाही. असा प्रयत्न करणारे डोनाल्ड ट्रम्प पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत.