
इस्रायल आणि इराणमध्ये सुरु झालेल्या युद्धाला आता दहा दिवस होत आलेत. इराण अणूबॉम्ब बनवण्याच्या जवळ आहे, असा दावा करत इस्रायलने या युद्धाची सुरुवात केली. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री अमेरिकेची या युद्धात एन्ट्री झाली. त्यामुळे येणाऱ्या दिवसात युद्ध अजून भडकणार, ही महायुद्धाची सुरुवात वैगेरे अशा बातम्या सुरु आहेत. पण वस्तुस्थितीला धरुन विश्लेषण केलं, तर पुढच्या काही दिवसात या युद्धाची तीव्रता कमी होईल किंवा तडजोडीचा मार्ग निघेल असं चित्र आहे. जगात कुठेही युद्ध सुरु झालं की, कोण विजेता? हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न असतो. पण जे देश युद्ध लढत असतात, त्या सैन्याच्या जनरल्ससाठी उद्देशपूर्ती महत्त्वाची असते. म्हणजे आपण हे युद्ध का करतोय? त्या मागचा उद्देश काय? हे त्या सैन्याच्या वरिष्ठ कमांडर्सना माहित असतं.
इस्रायलने हे युद्ध सुरु केलं, त्यामागे इराणचा अणवस्त्र कार्यक्रम पूर्णपणे नष्ट करुन टाकणं, जेणेकरुन आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित राहतील हा उद्देश होता. त्यानंतरचा दुसरा उद्देश आहे, सत्ता परिवर्तन. 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती होऊन अली खामेनेई यांची सत्ता आली. खामेनेई हे सुरुवातीपासून अमेरिका-इराणला संपवून टाकण्याच्या विचारांचे आहेत. दुसऱ्याबाजूला अमेरिका-इस्रायलला अणवस्त्र संपन्न इराण अजिबात मान्य नाही. त्यामुळे इस्रायलने थेट युद्ध सुरु केलं, त्यामागे इराणचा अणवस्त्र कार्यक्रम संपवण हा त्यांचा उद्देश होता. त्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. पुढच्या काही दिवसात इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाच किती नुकसान झालं ते चित्र स्पष्ट होईल.
इस्रायलला इराणमध्ये सत्ता बदल करता येईल का?
इराणमध्ये अली खामेनेईची पोलादी पकड लक्षात घेता सत्ता परिवर्तन सध्या तरी दृष्टीपथात दिसत नाही. कारण अली खामेनेईची हुकूमशाह असले, तरी त्यांनी सत्ता चालवण्यासाठी एक यंत्रणा उभी केलेली आहे. त्यामुळे इराणची जनता पूर्णपणे या यंत्रणेच्या विरोधात जाईल असं सध्या चित्र दिसत नाही. इराणमध्ये कुठलाही मोठा निर्णय घेण्याचा अधिकार खामेनेई अजूनही स्वत:कडे राखून आहेत. इराणच्या संसदेने होर्मुजचा खाडी मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण खामेनेई यांच्या मंजुरीनंतर या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. त्यावरुन खामेनेईंची इराणवरील पकड दिसून येते.
इराणच हे यश मान्य करावं लागेल
सध्या सुरु असलेल्या इराण-इस्रायल युद्धात पारडं कोणाच्या बाजूने झुकलेलं आहे? तर सहाजिकच इस्रायल. आपल्याकडे वृत्तवाहिन्यांवर इराणच्या मिसाइल हल्ल्यात इस्रायलमध्ये उद्धवस्त झालेल्या, पडलेल्या इमारती दाखवतात. एक गोष्ट खरी आहे की, इराणने मिसाइल टेक्नोलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. त्यामुळेच इस्रायलच आर्यन डोम, डेविड स्लिंज आणि Arrow ही अभेद्य एअर डिफेन्स सुरक्षा प्रणाली इराण भेदू शकला. इराणची काही हायपरसोनिक स्पीडने येणारी मिसाइल इस्रायलला रोखता आली नाहीत. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. इस्रायलमध्ये लोकांना शत्रूवर हल्ला पाहण्याची सवय आहे. शत्रूची त्यांच्या देशात आलेली मिसाइल पाहण्याची सवय नाही. त्यामुळे युद्धभूमीतील इराणच हे यश अमान्य करता येणार नाही.
इस्रायलने इराणच्या नागरी वस्त्यांवर का हल्ले केले नाही?
पण इस्रायल ज्या प्रमाणे रोज इराणच्या बलाढ्य लष्करी अधिकाऱ्यांना, वैज्ञानिकांना, त्यांच्या सैन्य कारखान्यांना संपवत आहे, तसं इराणला करता आलेलं नाही. इराणने फक्त हल्ले करुन वित्तहानी केली. पण इस्रायलला रणनितीक दृष्टया कमजोर करता आलं नाही. त्यांचे लष्करी अधिकारी, वैज्ञानिक यांच्यापर्यंत इराण पोहोचू शकला नाही. इस्रायलने माघार घ्यावी म्हणून इराणने त्यांच्या नागरी भागांवर हल्ले केले. पण इस्रायली लोकांना अशा युद्धांची फार पूर्वीपासून सवय आहे. इस्रायलने जे लक्ष्य निर्धारित केलेलं, त्यानुसार अण्विक प्रकल्प, सैन्य ठिकाणं, बॅलेस्टिक मिसाइलचे कारखाने इथेच हल्ले केले. इराणच्या नागरी भागांना लक्ष्य केलं नाही. इस्रायलला असं करता आलं असतं. पण त्याने मोठी जिवतहानी झाली असती आणि रेजींम चेंज म्हणजे सत्ता बदलाच जे उद्दिष्टय आहे ते साध्य होणारं नाही.
उद्दिष्टय पूर्ण झालं, मग आता इस्रायल खामेनेईला सोडणार का?
म्हणून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आम्ही सामान्य इराणी जनतेसोबत आहोत हेच सांगत आहेत. इराण लढतोय, पण ते फक्त बॅलेस्टिक मिसाइलनेच. त्यांच्याकडे जुन्या काळातील फायटर जेट्स आहेत. त्यामुळे त्याचा असूनही उपयोग नाही. इस्रायलने त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त करुन टाकली आहे. त्यामुळे इस्रायलला वाटतं तेव्हा इराणच्या हवाई हद्दीत जाऊन हल्ले करतायत. अली खामेनेईला संपवल्यानंतर हे युद्ध संपेल असं बेंजामिन नेतन्याहू यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. इस्रायलच महत्त्वाच उद्दिष्टय पूर्ण झालय. त्यामुळे सध्या सुरु असलेलं युद्ध संपवण्यासाठी ते कदाचित अली खामेनेईला हात लावणार नाहीत. पण त्यांचा इतिहास लक्षात घेता ते आपल्या शत्रूला सोडत नाहीत. हमास आणि हिज्बोल्लाह चीफला इस्रायलनेच मारलं. त्यामुळे आज ना उद्या ते खामेनेईवर पण हल्ला करतीलच. कारण अली खामेनेई इराणच्या सत्तेवर राहणं हे इस्रायलच्या भविष्याच्या दृष्टीने चांगलं नाही. कारण हमास, हौथी, हिजबोल्लाह इस्रायलच्या सभोवताली या दहशतवादी संघटना या इराणनेच उभ्या केल्या होत्या. त्यामुळे खामेनेईला लवकरात लवकर संपवण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल.
रशिया इराणच्यावतीने नाही लढणार
रशिया आणि चीन हे दोन बलाढ्य देश इस्रायलच्या बाजूने उभे राहणार असं म्हटलं जातं. पण आता उभे राहून काय उपयोग? अमेरिका-इस्रायलला जे करायचं होतं, ते त्यांनी केलं. रशिया आणि चीन इराणच्या बाजूने युद्ध लढायला उतरणार का? तर त्याचं उत्तर ‘नाही’ असचं आहे. कारण रशियाला अमेरिका-इस्रायलला रोखायचं असतं, तर त्यांनी इराणला आपली अत्याधुनिक शस्त्रास्त्र केव्हाच दिली असती. अमेरिकेला रोखण्यासाठी आपलं नौदल पाठवलं असतं, फायटर जेट्स दिली असती. पण यापैकी रशिया आणि चीनने काहीच केलं नाही. त्यांनी इराणला फक्त तोंडी सपोर्ट दिला, निषेध केला आणि ते तेवढच करु शकतात.
इराणची मदत करण्यात रशियाचं नुकसान काय?
कारण रशियाची सध्या युक्रेन बरोबर लढाई सुरु आहे. रशियाने इथे जर इराणला फायटर जेट्स, Advance शस्त्र दिलीत तर अमेरिका तिथे युक्रेनला Advance शस्त्र देईल. कदाचित रशियाच्या हवाई हद्दीत घुसण्याची युक्रेनला परवानगी देईल. रशियाला हे परवडणारं नाही. कुठलाही देश सर्वप्रथम आपलं हित बघतो. चीनची व्यापारी मानसिकता आहे. त्यामुळे हे देश इराणसाठी उभे राहणार नाहीत. रशिया कदाचित इराणला S-400 किंवा दुसरी अत्याधुनिक बॅलेस्टिक मिसाइल्स देईल. पण त्या पलीकडे ते फार मदत करु शकणार नाहीत. दुसरीकडे चीन इराणवरील हल्ल्याचा निषेध करत असेल, तर तैवानच्या बाबतीत त्यांच्या आक्रमकतेच काय?. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक देश आपल्या सोयीची भूमिका घेत असतो. त्यामुळे इराणने रशिया-चीनकडून फार अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही. त्यांना काही करायचं असतं, तर इराणच एवढ नुकसान झालचं नसतं.