Iran-Israel War : मोठी बातमी! इराणच्या अणू केंद्रावर पुन्हा मोठा हल्ला

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, शनिवारी मध्यरात्री अमेरिकेकडून इराणच्या तीन अणू केंद्रांवर हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा इराणच्या फोर्डो आणू तळावर मोठा हल्ला करण्यात आला आहे.

Iran-Israel War : मोठी बातमी! इराणच्या अणू केंद्रावर पुन्हा मोठा हल्ला
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 23, 2025 | 3:57 PM

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, शनिवारी मध्यरात्री अमेरिकेकडून इराणच्या तीन अणू केंद्रांवर हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा इराणच्या फोर्डो अणू तळावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी अमेरिकेनं नाही तर इस्रायलकडून इराणच्या अणू तळाला लक्ष्य करण्यात आलं आहे.

इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी इस्रायलकडून इराणच्या फोर्डो अणू केंद्रावर हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी अमेरिकेनं ज्या ठिकाणी हा हल्ला केला होता, त्याच ठिकाणी आता इस्रायलने देखील हल्ला केला आहे. अमेरिकेकडून इराणच्या तीन अणू केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं होतं, त्यानंतर आता इस्रायलने इराणच्या फोर्डो अणू केंद्रावर हल्ला केला.

दरम्यान अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर या हल्ल्यावर इराणची प्रतिक्रिया समोर आली आहे.  इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे, तसेच आम्ही अण्वास्त्र कार्यक्रम बंद करणार नसून सुरूच ठेवणार असल्याचं इराणचे उपपरराष्ट्र मंत्री माजिद तख्त यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मध्यपूर्वेमध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह आहेत.

अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध 

दरम्यान अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या या हल्ल्याचा अनेक देशांनी निषेध केला आहे. पाकिस्तानकडून सुद्धा अमेरिकेच्या या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेनं अंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. तसेच तुर्कीने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मध्यपूर्वेमधील तणाव हा चर्चेद्वारेच सोडवला जावा, अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेमधील तणाव आणखी वाढू शकतो असं तुर्कीने म्हटलं आहे.

रशियाची प्रतिक्रिया  

रशियानं देखील अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे, अमेरिकेचा हा हल्ला अयशस्वी झाला आहे, कारण अनेक देश इराणला अण्वास्त्र देण्यास तयार आहेत असं रशियानं म्हटलं आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर आता मध्यपूर्वेमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इस्रायलकडून देखील इराणच्या फोर्डो अणू केंद्रावर हल्ला करण्यात आला आहे.  इराणकडून देखील आता इस्रायलवर प्रतिहल्ला होण्याची शक्यात आहे.