शेजारच्या देशात मोठ्या घडामोडी… एक दोन नव्हे, 7 नेत्यांना फाशीची शिक्षा; मोठी खळबळ
बांगलादेशात 2024 च्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान हिंसा भडकवल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण-2 ने 7 अवामी लीग नेत्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मानवतेविरुद्ध गंभीर गुन्हे केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनाही यापूर्वी फाशी सुनावण्यात आली होती.

बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण-2 (ICT-2) ने प्रतिबंधित केलेल्या अवामी लीगच्या सात नेत्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व नेत्यांना 2024च्या विद्यार्थी आंदोलना दरम्यान हिंसा भडकावण्याच्या आणि मानवतेच्या विरोधात गंभीर गुन्हा केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर या सातही जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे बांगलादेशमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जस्टीस मोहम्मद नजरुल इस्लाम चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या सर्व नेत्यांच्या गैरहजेरीत ही सुनावणी झाली. सरकारकडून नेमण्यात आलेल्या वकिलांनी यावेळी बाजू मांडली. अवामी लीगचे महासचिव आणि माजी मंत्री ओबैदुल कादर, संयुक्त महासचिव बहाउद्दीन नसीम आणि माजी सूचना तसेच माहिती राज्यमंत्री मोहम्द अली अराफात आदींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच युबो लीगचे अध्यक्ष शेख फजले शम्स पारश, महासचिव मैनुल हुसैन खान निखिल, विद्यार्थी लीगचे अध्यक्ष सद्दाम हुसैन आणि महासचिव शेख वली आसिफ एनान यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हिंसा भडकवल्याचा आरोप
या नेत्यांवर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मिटिंग घेऊन हिंसेची योजना आखल्याचा आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडून टाकण्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. आंदोलना दरम्यान देशभरात झालेले मृत्यू, दडपशाही आणि मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा या आरोपींनी प्रयत्न केल्याचा दावाही वकिलांनी केला आहे.
या प्रकरणात 22 जानेवारी रोजी सात आरोप सिद्ध करण्यात आले होते. 17 फेब्रुवारीपासून यावर सुनावणी सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर 5 ऑगस्ट 2024 रोजी शेख हसीना यांचं सरकार पडलं. त्यानंतर त्यांनी भारतात शरण घेतली. संयुक्त राष्ट्राच्या मतानुसार, जुलै आणि ऑगस्ट 2024 दरम्यान झालेल्या हिंसेत सुमारे 1400 लोक मारले गेले होते.
हसीना यांनाही फाशी
दरम्यान, यापूर्वीच नोव्हेंबर 2025मध्ये याच कोर्टाने माजी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृह मंत्री असदुज्जमां खान कमाल यांना मानवतेच्या विरोधा केलेल्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. कोर्टाने हसीना यांना कमांड जबाबदारीच्या अंतर्गत दोषी मानलं होतं. दरम्यान, एमनेस्टी इंटरनॅशनल आणि ह्यूमन राइट्स वॉच सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनानी निष्पक्ष सुनावणीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.