Shivsena Symbol Hearing : शिंदेंच्या वकिलाने काढला हुकूमी एक्का… थेट भावनेलाच घातला हात; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना चिन्ह सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी भावनिक युक्तिवाद केला. ठाकरे गटाने कार्यकर्त्यांची फसवणूक करून निवडणूक एकासोबत लढून दुसऱ्यासोबत सत्ता स्थापन केल्याचे त्यांनी मांडले. कौल यांनी पक्ष कार्यकर्ते हे राजकीय पक्षाचा प्राण असून, संघटनात्मक बहुमताचे महत्त्व अधोरेखित केले.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीच्या वेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी आज थेट भावनिकतेला हात घातला. ठाकरे गटाने कशा प्रकारे कार्यकर्त्यांची फसवणूक केली, निवडणूक एका पक्षासोबत लढली आणि दुसऱ्या पक्षासोबत आघाडी करून कशी सत्ता स्थापन केली, याकडे कोर्टाचं लक्ष वेधलं. दुसऱ्याच सुनावणीत कौल यांनी भावनिकतेचा मुद्दा काढल्याने शिंदे गटाची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे उद्या सुनावणीच्यावेळी कौल कोणत्या मुद्द्यांना हात घालतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासामोर ही सुनावणी सुरू आहे. यावेळी शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणुकीच्या आधी केलेली वैचारिक युती तोडून निवडणुकीनंतर दुसऱ्या पक्षासोबत सरकार स्थापन करण्यात आलं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता. सत्ता मिळवण्यासठी वैचारिकदृष्ट्या विरोधी आणि भ्रष्ट पक्षांशी युती केल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपमानजनक प्रश्नांना सामोर जावे लागत होते, असा भावनिक युक्तिवाद नीरज कौल यांनी केला.
कार्यकर्ते राजकीय पक्षाचा प्राण
संघटनात्मक बहुमताची चाचणी गरजेची असते. कारण निवडणूक आयोग पक्षाच्या प्रत्येक प्राथमिक सदस्यामध्ये सार्वमत घेऊ शकत नाही. राजकीय पक्षाचा प्राण म्हणजे त्याचे कार्यकर्ते आणि तळागाळातील कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते थेट मतदारांशी जोडलेले असतात. जर कार्यकर्ते आणि नामनिर्देशित संस्थांमध्ये समन्वय नसेल तर संघटनात्मक बहुमताच्या चाचणीच महत्त्व कमी होतं. तसेच संघटनात्मक निकषाचेही महत्त्व कमी होते, याकडेही कौल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं.
संघटनात्मक बहुमताचा निकष
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक चिन्ह आदेशांतर्गत 2018 च्या पक्षघटनेची वैधता तपासण्याचा अधिकार आयोगाला नव्हता. मात्र, याचिकाकर्ते स्वतः ज्या निकषावर अवलंबून आहेत, म्हणजेच संघटनात्मक बहुमताचा निकष, त्याच संदर्भात निवडणूक आयोगाने 2018 च्या पक्षघटनेची तपासणी केली, असंही त्यांनी सांगितलं. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा आजचा युक्तिवाद संपला आहे. उद्या ते परत युक्तिवाद करणार आहेत. कौल उद्या कोणत्या मुद्द्यांना हात घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
