
बांग्लादेशात हिंसाचारादरम्यान दीपू दास या हिंदू व्यक्तीची निदर्यतेने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर भारतीयांच्या मनात बांग्लादेशबद्दल प्रचंड संताप आहे. दिल्लीसह अनेक ठिकाणी प्रदर्शन सुरु आहेत. भारत सरकारने बांग्लादेशकडे आपला आक्षेप नोंदवला आहे. या रागाचा परिणाम दिसून येतोय. बांग्लादेशातील अंतरिम सरकारला नाईलाजाने झुकावं लागलं आहे. तिथले शिक्षण मंत्री सीआर अबरार यांनी मंगळवारी दीपूच्या कुटुंबाची भेट घेतली. बांग्लादेश सरकारचे चीफ एडवायजर मुहम्मद युनूस यांच्या ऑफिसने एक्सवर पोस्ट करुन याची माहिती दिली.
युनूस यांच्या ऑफिसने फोटो शेअर करत दीपू चंद्र दास यांच्या हत्येबद्दल खूप दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. सरकारच्यावतीने शिक्षण सल्लागार प्रोफेसर सीआर अबरार यांनी मंगळवारी मैमनसिंहमध्ये पीडित कुटुंबाची भेट घेतली. या कठिण काळात सरकार पाठीशी उभं राहिलं असं आश्वासन दिलं.सीआर अबरार दीपू चंद्र दासचे वडिल रबीलाल दास आणि अन्य लोकांची भेट घेतली.
मग त्यांचा धर्म आणि बॅकग्राऊंड काहीही असो
“ही हत्या एक क्रूर स्वरुपाचा गुन्हा आहे. अशा गोष्टींना बांग्लादेशी समाजात स्थान नाही” असं शिक्षण सल्लागार अबरार म्हणाले. “मतभेद हिंसेच कारण होऊ शकत नाहीत. कुठल्याही व्यक्तीला कायदा आपल्या हातात घेण्याचा अधिकार नाही” याचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी कुटुंबाला आश्वसान दिलं की, ‘अधिकारी उचित प्रक्रियेच्या माध्यमातून न्याय मिळवून देतील’ या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक झाली आहे. “हिंसेच्या अशा प्रकारात कायदा आपलं काम चोख बजावेल. सरकार सर्व नागरिकांची सुरक्षा आणि सन्मानासाठी कटिबद्ध आहे. मग त्यांचा धर्म आणि बॅकग्राऊंड काहीही असो” असं युनूस म्हणाले.
बांग्लादेशने भारतीय उच्चायुक्तांना का हजर व्हायला सांगितलं?
25 वर्षीय दीपूच्या हत्येनंतर भारताने अत्यंत कठोर प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी बांग्लादेशचे उच्चायुक्त रियाज हामिदुल्लाह यांना तलब केलं. ढाका येथे भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना बांग्लादेशी परराष्ट्र मंत्रालयाने हजर व्हायला सांगितल्यानंतर काही तासांनी भारताने सुद्धा असच पाऊल उचललं. भारतात बांग्लादेशी दूतावासांबाहेर झालेल्या हिंसक विरोध प्रदर्शनानंतर बांग्लादेशने गंभीर चिंता व्यक्त केली.