Syria Civil War : सीरियात गृहयुद्ध का भडकलं? आतापर्यंत काय-काय घडलं? यात भारताचा फायदा की तोटा?
Syria Civil War : सीरियात गृहयुद्धाची सुरुवात का झाली? सीरियामध्ये कधीपासून बाशर अल-असाद यांच्या कुटुंबाची सत्ता होती? सीरियात जे घडलय, त्यामुळे भारताला फायदा होणार की नुकसान? या सगळ्या प्रश्नांची उत्तर या लेखातून समजून घ्या. एक नेत्ररागतज्ञ असलेला माणूस राजकारणात कसा आला? इतक्या सर्वोच्च सत्तापदापर्यंत कसा पोहोचला?

15 वर्षाच्या गृह युद्धानंतर बाशर अल-असाद यांना सत्तेवरुन बेदखल करण्यासाठी फक्त 15 दिवस लागले. रविवार 8 डिसेंबरला बंडखोरांच्या फौजांनी सीरियाची राजधानी दामास्कसवर ताबा मिळवला. बंडखोरांनी सीरियाच्या राजधानी प्रवेश करताच बाशर अल-असाद कुटुंबियांसह देश सोडून पळून गेले. ते रशियात आश्रयाला गेल्याची दाट शक्यता आहे. कारण सीरियाच हे गृहयुद्ध इतकी वर्ष खेचलं गेलं, बाशर आपली सत्ता टिकवू शकले ते रशियाच्या मदतीमुळेच. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या संघर्षात त्यांना साथ दिली. पण रशिया आता आपल्या युद्धात अडकला आहे. इराणचा इस्रायलबरोबर संघर्ष सुरु आहे. युक्रेन युद्ध अजून कधीपर्यंत चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे बंडखोरांच्या फौजा सीरियामधील एक-एक शहर ताब्यात घेत असताना रशिया आणि इराणकडून बाशर यांना मदत मिळू शकली नाही. ...
