
गेल्या काही काळापासून अमेरिका आणि रशियातील तणाव वाढला आहे. आपली ताकद दाखवण्यासाठी अमेरिकेने अणुचाचणी केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या या चाचणीला उत्तर देत रशियानेही अण्वस्त्र चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. खासकरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची डोकेदुखी वाढली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार पुतीन यांनी म्हटले की, रशिया नेहमीच व्यापक अण्वस्त्र चाचणी बंदी कराराचे (CTBT) पालन करत आलेला आहे, मात्र जर अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाने अण्वस्त्र चाचणी केली तर रशिया देखील ती चाचणी करेल. कारण हा देशाच्या सुरक्षेशी संबंधित एक गंभीर मुद्दा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेने ही चाचणी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता रशियाही आगामी काळात ही चाचणी करण्याची शक्यता आहे.
रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलोसोव्ह यांनी पुतीन यांना रशियाच्या वाढत्या अण्वस्त्र क्षमतेबद्दल माहिती दिली आहे. याबाबत बोलताना बेलोसोव्ह यांनी म्हटले की, रशियाने अण्वस्त्र चाचणीसाठी त्वरित तयारी सुरू करण्याची आवश्यकता आहे. नोवाया झेमल्या या आर्क्टिक प्रदेशातील ठिकाण चाचणीसाठी खूप कमी वेळेत तयार केले जाऊ शकते.’ त्यामुळे आता रशियाची अण्वस्त्र चाचणी ही नोवाया झेमल्या या ठिकाणी होण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार पुतीन यांनी परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, गुप्तचर संस्था आणि इतर विभागांना अमेरिकेच्या ताकदीबद्दल आणि भविष्यातील योजनांबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या अधिकाऱ्यांना या माहितीचे विश्लेषण करण्याचे आणि अणुचाचणीच्या तयारीबाबत रशियन सुरक्षा परिषदेला शिफारसी सादर करण्याचाही आदेश दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात लवकरच रशियाकडून चाचणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आता रशियाने अण्वस्त्र चाचणीबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थिती गंभीर आणि धोकादायक बनली आहे. चीन आणि फ्रान्सने शेवटची अणुचाचणी 1996 मध्ये आणि सोव्हिएत युनियनने 1990 मध्ये केली होती. मात्र सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर रशियाने कोणतीही चाचणी केलेली नाही. आता ही रशियाची पहिलीच अण्वस्त्र चाचणी असण्याची शक्यता आहे.