
जागतिक पातळीवर सध्या अशांतता आहे. बरेच देश अमेरिकेवर नाराज आहेत. अशातच आता चीनने आक्रमक विधान करत दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. चीनने म्हटले की, ‘अमेरिका आणि दक्षिण कोरियाने एकत्रित बनवलेल्या अणु पाणबुड्यांचा वापर केला तर आम्ही गप्प बसणार नाही.’ अमेरिकेच्या नौदलाच्या एका अधिकाऱ्याच्या विधानानंतर चीनने हे विधान केले आहे.
अमेरिकेचे अॅडमिरल डॅरिल कॉडल यांनी दक्षिण कोरियाने तयार केलेल्या पाणबुड्या चीनच्या सामना करण्यासाठी फायदेशीर ठरतील असं विधान केले होते. याला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले, ‘दक्षिण कोरिया आणि अमेरिका हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळतील अशी आशा आहे.’ तसेच दक्षिण कोरियातील चीनचे राजदूत दाई बिंग यांनी म्हटले की, ‘दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने चीनला रोखण्याच्या उद्देशाने अशी युती करू नये, कारण यामुळे त्यांना उत्तर कोरियाच्या धोक्यांना तोंड देणे अवघड जाईल.’
चीनचे सरकारी वृत्तपत्र, ग्लोबल टाइम्सने दाई बिंग यांच्या हवाल्याने म्हटले की, ‘जर दक्षिण कोरिया-अमेरिका युतीच्या उद्दिष्टात बदल झाला तर या युतीबद्दल चीनचा दृष्टिकोनही बदलेल.’ कारण याआधी अमेरिकेचे अॅडमिरल डॅरिल कॉडल यांनी दक्षिण कोरियाच्या मीडियाला सांगितले होते की, ‘मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारी येते. चीनचा सामना करण्यासाठी त्या पाणबुडीचा वापर करणे ही एक नैसर्गिक अपेक्षा आहे असे मला वाटते.’ यामुळे आता चीनने आक्रमक पवित्रा घेत या दोन्ही देशांना थेट धमकी दिली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाने अमेरिकेसोबत पार्टनरशीपमध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या बांधण्याचा करार अंतिम झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता अमेरिकेने या पाणबुड्यांच्या माध्यमातून चीनवर नियंत्रण ठेवण्याची भाषा केल्याने चीनने चोख प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये या देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.