
भारतामध्ये स्वस्त स्मार्टफोनची मागणी कमी झाल्यामुळे चिनी मोबाईल कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. विशेषत Xiaomi, Oppo, OnePlus आणि Realme यांच्या सेल्समध्ये गेल्या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच घसरण झाली. रेग्युलेटरी फाइलिंगमधील माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतात काम करणाऱ्या नऊ मोठ्या चिनी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या एकूण महसुलात 4.5% घट झाली. भारतात चिनी कंपन्यांच्या महसुलात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वीच्या वर्षी त्यांनी 42% वाढ नोंदवली होती. दरम्यान, महागडे स्मार्टफोन सेगमेंटमध्ये Apple आणि Samsung यांना फायदा झाला. तसेच माहितीनुसार बाजारपेठे मध्ये Vivo ने तुलनेने चांगली कामगिरी केली.
रिटेल मूल्य कमी झाले
मार्केट इंटेलिजन्स कंपनी काउंटरपॉईंट संशोधनचे डायरेक्टर तरुण पाठक यांनी सांगितले की, 2025 मध्ये भारतात 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनचा व्हॅल्यू शेअर 38% वरून घटून 29% झाला आहे. म्हणजेच स्वस्त मोबाईल्सची मागणी कमी झाली आहे. याचा सर्वाधिक फटका स्पर्धात्मक किंमत असलेल्या चिनी ब्रँड्सना बसला. काउंटरपॉईंट च्या अहवालानुसार, भारतात चिनी स्मार्टफोन ब्रँड्सचा रिटेल व्हॅल्यू शेअर 2023 मधील 54% वरून 2025 मध्ये 48% पर्यंत खाली आला. मात्र विक्रीच्या संख्येनुसार त्यांचा मार्केट शेअर 73% ते 75% दरम्यान स्थिर राहिला.
तज्ज्ञांच्या मते, महागड्या स्मार्टफोनची मागणी वाढत असली तरी सामान्य आणि मिड-सेगमेंटमध्ये मंदी कायम राहू शकते. याशिवाय मेमरी चिप्सच्या किमती वाढल्यामुळे स्मार्टफोनचे दरही वाढत आहेत. मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांची कामगिरी कमकुवत राहिल्याने चिनी इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सच्या एकूण महसुलावर परिणाम झाला. स्मार्टफोनव्यतिरिक्त मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मात्र चांगली वाढ झाली. विशेषतः Haier, Lenovo आणि Midea यांनी चांगली कामगिरी केली. महागड्या घरगुती उपकरणांची मागणीही मजबूत राहिली. दरम्यान, महागड्या मॉडेल्सचा मोठा पोर्टफोलिओ असलेल्या Vivo ने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत महसुलात 11% वाढ नोंदवली. तसेच Apple आणि Samsung यांनी प्रीमियम उत्पादनांच्या जोरावर ग्राहकांच्या बदलत्या पसंतीचा फायदा घेत टॉप चिनी ब्रँड्सकडून व्हॅल्यू मार्केट शेअर मिळवला.
आयफोनच्या विक्रीत वाढ झाली
FY25 मध्ये Apple ची भारतातील विक्री 18% ने वाढून 79,378 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. तर Samsung ची विक्री 12% वाढून 1.11 लाख कोटी रुपये झाली. कोरियाची घरगुती उपकरणे बनवणारी कंपनी LG Electronics हिनेही FY25 मध्ये 14% वाढ नोंदवली. ROC फाइलिंगचा अभ्यास करणाऱ्या AltInfo या बिझनेस इंटेलिजन्स कंपनीचे संस्थापक Mohit Yadav यांनी सांगितले की, Vivo ची वाढ जवळपास सॅमसंगइतकीच झाली. पण इतर चिनी कंपन्यांची वाढ तुलनेने कमी राहिली. त्यांच्या मते, बाजारपेठ आता उत्पादनांकडे आणि मजबूत ऑफलाइन रिटेलकडे वळत आहे. या बदलाशी जुळवून घेणारा Vivo हा एकमेव चिनी ब्रँड दिसतो, असे आकडे दर्शवतात.