
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप सध्या टॅरिफ-टॅरिफ खेळण्यात व्यस्त आहेत. दररोज उठून ते टॅरिफ वाढवण्याची धमकी देत असतात. काही देशांनी त्यांचा निर्णय मान्य केला आहे, मात्र काही देशांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकण्यास नकार दिला आहे. याच टॅरिफ युद्धादरम्यान कोलंबियाने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. आपला सर्वात मोठा लष्करी भागीदार असलेल्या अमेरिकेकडून कोलंबियाने शस्त्रास्त्र खरेदी स्थगित केली आहे. गृहमंत्री अर्मांडो बेनेडेट्टी यांनी या निर्णयाची घोषणा केली. राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी अमेरिकेवर कोलंबियाच्या देशांतर्गत राजकारणात हस्तक्षेप करण्याचा आणि पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी “कठपुतळी अध्यक्ष” शोधण्याचा आरोप केला होता, त्यानंतरच ही घोषणा करण्यात आली. “आतापासून… अमेरिकेकडून शस्त्रे खरेदी केली जाणार नाहीत,” असे बेनेडेट्टी यांनी ब्लू रेडिओला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी कोलंबियाला ड्रग्जविरुद्धच्या लढाईत मित्र म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. तसेच देशावर कोकेन उत्पादन “सर्वकालीन उच्चांकावर” वाढू देत असल्याचा आरोप केला, असे वृत्त अल जझीराने दिले आहे. हे पाऊल मोठ्या प्रमाणात प्रतीकात्मक असले तरी, कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांना कोलंबियामध्ये पाठवण्यावरून वादांना तोंड देत असल्यामुळे तणावग्रस्त युतीमध्ये या निर्णयामुळे आणखीनच भर पडली आहे.
समस्या त्यांची आहे, आपली नाही
पेट्रो यांनी X वरील अनेक पोस्टमध्ये त्यांच्या सरकारच्या ड्रग्ज विरोधी धोरणाचे समर्थन केले आणि त्यांच्या कार्यकाळात मागील सरकारांपेक्षा जास्त कोकेन जप्त करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. कोलंबिया अमेरिकेकडून ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही होणार नाही आणि त्यांना अमेरिकेच्या मदतीची पर्वा नाही असेही त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केल्याचे वृत्त आहे. “आम्हीच त्यांना मदत करतो, कारण समस्या त्यांची आहे, आपली नाही,” असे पेट्रो म्हणाले, कोलंबियन सैन्याने अमेरिकन “मदतीवर” असलेले अवलंबित्व कमी करावे असे सुचवले.
अल जझीराच्या रिपोर्टनुसरा, कोलंबियामध्ये ड्रग्ज विरोधी कारवायांसाठी अमेरिकेची दरवर्षी सुमारे 380 दशलक्ष डॉलर्स मदत मिळते. ट्रम्पच्या यादीतून वगळण्याचा या निधीवर काय परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ड्रग्ज युद्ध हाताळण्यात ‘अनियमित’ असल्याची टीका केली होती, त्याला पेट्रो यांनी प्रत्युत्तर देताना, लॅटिन अमेरिकन पाण्यात नागरी बोटींवर बॉम्बफेक करणे ‘खरोखरच अनियमित’ होते. ट्रम्प यांनी ड्रग्ज कार्टेल चालवत असल्याचा आरोप असलेल्या दोन व्हेनेझुएलाच्या बोटींवर हल्ला करण्याच्या आदेशाचा त्यांनी संदर्भ दिला.
अल जझीराने दिलेल्या रिपोर्टनुसार, कोलंबियाला अमेरिकेच्या हितसंबंधांसमोर “गुडघे टेकू” देणार नाही किंवा कोका शेतकऱ्यांना “मारणार” नाही अशी शपथ पेट्रो यांनी घेतली आहे. 2022 साली सत्ता हाती घेतल्यापासून, त्यांनी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ड्रग्जविरुद्धच्या युद्धात बदल करण्याची आणि निर्मूलनापेक्षा सामाजिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात कोलंबियामध्ये कोकाची लागवड सुमारे 70 टक्क्यांनी वाढली. 2023 सालापर्यंत कोका लागवडीखालील क्षेत्र जवळजवळ तिप्पट वाढून 2,53, 000 हेक्टर होऊ शकते असे संयुक्त राष्ट्रांच्या ड्रग्ज आणि गुन्हेगारी कार्यालयाने अहवालात नमूद केलं आहे.