Donald Trump : डील फायनल पण.. 80 व्या वाढदिवशी इराणने ट्रम्प यांना केक कटिंगच्या वेळी ते सुख मिळू दिलं नाही

Donald Trump : अमेरिका-इराणमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर 107 दिवसांनी अखेर शांतता कराराची घोषणा झाली आहे. जगासाठी ही चांगली बातमी आहे. यामुळे महागाई कमी होईल. पण ही डील करताना इराणने डोनाल्ड ट्रम्प यांची वाढदिवसाची मजा घालवली.

Donald Trump : डील फायनल पण.. 80 व्या वाढदिवशी इराणने ट्रम्प यांना केक कटिंगच्या वेळी ते सुख मिळू दिलं नाही
US President Donald Trump
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 15, 2026 | 9:23 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी 14 जूनला वयाच्या 80 व्या वर्षात पदार्पण केलं. ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा दिवस होता. आपला बर्थ डे खास बनवण्यासाठी त्यांनी बरीच तयारी केली होती. ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्रपती आहेत, ज्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी व्हाइट हाऊसच्या लॉनमध्ये UFC फाइट ठेवली. त्यांची अजून एक इच्छा होती, जे युद्ध ट्रम्प यांनी 107 दिवस आधी इराण विरुद्ध सुरु केलं, ते संपवण्यासाठी डीलची घोषणा त्यांच्या जन्मदिनीच व्हावी. पण त्यांच्या या इच्छेवर इराणने पाणी फिरवलं. अमेरिका आणि इराणमध्ये डील फायनल झाल्याची घोषणा झाली. पण काही तास उशिराने झाली. त्यामुळे ट्रम्प यांना केक कापताना, डील माझ्या बर्थ डेच्या दिवशी झाली हे सुख मिळू शकलं नाही.

एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्याने CNN ने म्हटलय की, इराणच्या इस्लामिक राजवटीला कराराची घोषणा अर्ध्यारात्री आधी नको होती. कारण त्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस असतो. थोड्याफार प्रमाणात इराणची ही मागणी मान्य सुद्धा झाली. अर्ध्या रात्रीनंतर काही मिनिटांनी इराणमध्ये डील फायनल झाल्याची घोषणा करण्यात आली. इराणसाठी हा सोमवारचा दिवस होता. पण अमेरिकेत रविवारच होता, म्हणजे ट्रम्प यांच्या वाढदिवसाचा दिवस. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार फायनल झाला आहे. 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये त्यावर शिक्कामोर्तब होईल. या करारानुसार सर्वच आघाड्यांवर लेबनानमध्ये सुद्धा सैन्य कारवाई तात्काळ, कायमसाठी संपवण्यात येईल.

हॉर्मुज पूर्णपणे खुलं होऊ शकत नाही

हा करार म्हणजे या युद्धातील सर्वात मोठं कूटनितीक यश असल्याचं म्हटलं जातय. या करारानुसार दोन्ही देशांना अणवस्त्राच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी 60 दिवसांची मुदत मिळेल. चर्चेत सहभागी असलेल्या पक्षांनुसार, करार लागू झाल्यानंतर हॉर्मुज जलवाहतुकीसाठी खुलं होईल. त्यामुळे जगभरात वाढलेल्या तेल आणि गॅसच्या किंमती कमी होतील. हॉर्मुज पूर्णपणे खुलं होऊ शकत नाही. कारण समुद्रात पेरलेल सुरुंग हटवणं, नुकसान झालेल्या भागाची दुरुस्ती आणि सुरक्षा सुनिश्चित करायला वेळ लागू शकतो. त्यानंतरच युद्धाआधी जलवाहतुकीची जी स्थिती होती, ते चित्र दिसेल.

Follow Us