मोठी बातमी ! इराणमधील आंदोलकांच्या हत्यांना डोनाल्ड ट्रम्प जबाबदार, गंभीर आरोपाने जगात खळबळ

Iran Protest : इराणमधील आंदोलनात आतापर्यंत 3 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांना अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शाब्दिक हल्ला केला.

मोठी बातमी ! इराणमधील आंदोलकांच्या हत्यांना डोनाल्ड ट्रम्प जबाबदार, गंभीर आरोपाने जगात खळबळ
Trump-and-Iran
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 17, 2026 | 9:46 PM

इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यात आतापर्यंत 3 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आज इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांना अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. इराणमधील आंदोलनात झालेल्या हिंसाचार, जीवितहानीसाठी खामेनी यांनी थेट ट्रम्प यांना जबाबदार धरले. डोनाल्ड ट्रम्प हे गुन्हेगार आहेत, आम्ही देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय कोणत्याही कट रचणाऱ्या गुन्हेगारांना सोडणार नाही असंही खामेनी यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराणला युद्ध नको आहे

इराणी राज्य माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार खामेनी म्हणाले की, इराणमधील अलिकडील आंदोलन हे मागील घटनांपेक्षा वेगळं आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वतः उघडपणे यात सहभागी झाले होते. अमेरिकेने इराणविरुद्ध कट रचला आणि हिंसाचाराला खतपाणी घातले, ज्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि देशाचे मोठे नुकसान झाले. इराणमध्ये निर्माण झालेली अशांतता ही अमेरिकेच्या चिथावणीचा परिणाम आहे. इराणने या कटाचा कणा मोडला आहे आणि आता कट रचणाऱ्यांनाही तोडून टाकले पाहिजे. इराणला युद्ध नको आहे, परंतु देशाविरुद्ध काम करणाऱ्यांना सोडणार नाही.

3000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार इराणमधील आंदोलनात 3000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. खामेनी यांनी आरोप केला की अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित लोक या हिंसाचारामागे होते, ते सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत आणि लोकांचा जीव घेत होते. अमेरिकेच्या कटात सहभागी असलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना शिक्षा होईल.

आंदोलनाचे रूपांतर हिंसाचारात झाले

इराणमध्ये 28 डिसेंबर रोजी आर्थिक परिस्थितीविरुद्ध निदर्शने सुरू झाली होती. इराणी चलन डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचल्यामुळे तेहरानमधील व्यापाऱ्यांनी संप सुरू केला. मात्र कालांतराने मोठे आंदोलन सुरू झाले. या आंदोलनादरम्यान सरकारने सुमारे आठ दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. आता इंटरनेट सुरू करण्यात आले आहे. सध्या रस्त्यावर शांतता आहे, मात्र कडक सुरक्षा पहायला मिळत आहे, त्यामुळे वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे.