
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच 50 टक्के टॅरिफ लावून भारताला मोठा धक्का दिला आहे. सध्या अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय सामानावर 25 टक्के टॅरिफ आकारला जातोय. अजून काही दिवसांनी रशियाकडून तेल खरेदी करतो, म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लागेल. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच काही प्रमाणात नुकसान होईल. पण ट्रम्प भारताच्या बाबतीत जे करतायत, तोच नियम चीनला लावत नाहीयत. टॅरिफनंतर ट्रम्प प्रशासन आता भारतीयांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेत कायदेशीररित्या राहणाऱ्या 5.5 कोटीपेक्षा जास्त परदेशी नागरिकांच्या वीजाची समीक्षा केली जात आहे. इमिग्रेशन नियम मोडणाऱ्या परदेशी नागरिकांचा वीजा रद्द करण्यासाठी हे सर्व सुरु आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आलं.
ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय 5.5 कोटीपेक्षा जास्त संख्येने असलेल्या परदेशी नागरिकांबाबत असला, तरी यात भारतीय सुद्धा आहेत. अमेरिकेत सॉफ्टवेअर, आयटी क्षेत्रात भारतीय मोठ्या संख्येने काम करतात. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा त्यांना सुद्धा फटका बसू शकतो. परराष्ट्र विभागानुसार, सर्व अमेरिकी वीजा होल्डर्सची सतत तपासणी सुरु असते. नियमांच उल्लंघन आढळून आल्यास त्यांचा वीजा तात्काळ रद्द होईल. त्यांना त्यांच्या देशात पाठवून देण्यात येईल. वीजाची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेत राहणं बेकायदेशीर मानलं जातं. अमेरिकेच्या दृष्टीने असे लोक सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका निर्माण करु शकतात. गुन्हेगारी किंवा दहशतवादी कारवायांशी त्यांचा संबंध असू शकतो.
सातत्याने प्रतिबंध लावत आहे
जानेवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. सत्तेवर आल्यापासून ट्रम्प प्रशासनाचा तिथे बेकायदरित्या राहणारे प्रवासी, विद्यार्थी आणि एक्सचेंज वीजा होल्डर्सना डिपोर्ट करण्यावर भर आहे. वीजा होल्डर्सची ही रिव्यू प्रोसेस दीर्घकाळ चालेल. ट्रम्प प्रशासन वीजा अर्जदारांवर सातत्याने प्रतिबंध लावत आहे. यात सर्व वीज अर्जदारांना पर्सनल इंटरव्यू देण बंधनकारक करण्याचा सुद्धा समावेश होतो.
हे सुद्धा तपासलं जाईल
सुरुवातीला पॅलेस्टाइन समर्थक आणि इस्रायल विरोधात सहभागी असलेल्या वीजा होल्डर्स विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. पण आता या मोहिमेचा विस्तार झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, समीक्षेदरम्यान सर्व वीजा धारकांच्या सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी केली जाईल. ज्या देशातून हे वीजा धारक आहेत, तिथे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे का? हे सुद्धा तपासलं जाईल. अमेरिकेत निवास करताना त्यांनी कुठल्या नियमाच उल्लंघन केलय का? हे तपासलं जाईल.