
अमेरिका आणि इराण यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायल आणि अमेरिका सतत इराणवर हल्ले करत आहे. या हल्ल्यांना अमेरिकेकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवर इराणने केलेल्या बॉम्बहल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर काहीसा बदलल्याचे झाल्याचे दिसत आहे. युद्धाच्या 10व्या दिवशी ट्रम्प यांनी युद्धबंदीसाठीच्या चर्चेसाठी अमेरिका तयार असल्याचे संकेत दिले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की युंद्धबंदी करारासाठी इराणसोबत चर्चा होऊ शकते. मात्र या चर्चेसाठी काही अटी असणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मध्यपूर्वेतील या युद्धामुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. जगातील अनेक देशांना तेल संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रशिया, चीन, फ्रान्स यांनी युद्धविरामासाठी (सीजफायर) पुढाकार घेतला आहे. त्यानंतर आता अमेरिकेकडून सकारात्मक संकेत मिळताना दिसत आहे. फॉक्स न्यूजसोबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणचे नेते चर्चेसाठी उत्सुक आहेत आणि सतत संपर्क करत आहेत. मला त्यांच्याशी बोलण्यात कोणतीही अडचण नाही, पण सर्व काही अटींवर अवलंबून आहे. ट्रम्प यांनी पुढे असेही म्हटले की, ‘अमेरिका सुरुवातीपासूनच वाटाघाटी करण्यास इच्छुक होती, पण इराण सतत टाळाटाळ करत होता.’
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार ट्रम्प यांच्या सल्लागारांनी त्यांना इराणसोबत वाटाघाटीचा मार्ग शोधण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार, युद्ध खूप लांबत चालले आहे आणि त्याचा तोटा अमेरिकेलाही होऊ शकतो. असोसिएट प्रेसने गुप्तचर अहवालाच्या आधारे म्हटले आहे की, इराणमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता कमी आहे. कारण इराणची जनता सध्या त्यासाठी तयार नाही. त्यामुळे युद्ध सुरू राहिल्यास अमेरिकेचेच नुकसान होण्याची शक्यता आहे.
मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचे समर्थन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा स्टीव्ह विटकॉफ आणि जेराड कुशनेर चर्चा करण्यासाठी गेले होते, तेव्हा इराणने वेळकाढूपणा केला. विटकॉफ यांनी मला सांगितले की, इराण 11 अण्वस्त्रे तयार करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे हल्ला करणे हा आम्हाला योग्य पर्याय वाटला. ट्रम्प यांनी खाडी देशांवर झालेल्या हल्ल्यांसाठीही इराणवर टीका केली. ज्या देशांनी इराणवर हल्ला केला नव्हता, त्या देशांवरही इराणने बॉम्बहल्ले केले असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.