
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) दुसऱ्यांदा सत्तारूढ झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतातच. त्यांची बेधडक वक्तव्य आणि तेवढेच बेधडक निर्णयही चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. महासत्ता अमेरिकेला सर्वोच्च मानत ट्रम्प हे एकामागून एक , धडाधड निर्णय जाहीर करतात आणि त्याचे पडसाद जगभरात उमटत राहतात. भारतावर लादलेला अतिरिक्त टॅरिफ आणि H-1B व्हिसाच्या शुल्कात केलेली भरमसाठ वाढ यामुळे भारत- अमेरिकेचे संबंधही सध्या ताणलेले दिसत आहेत.
आता हेच ट्रम्प पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे, त्याला कारण आहे त्यांचा उडालेला भडका. ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्यांच्यासोबत तीन गंभीर घटना घडल्याचा दावा करत हा आपल्याविरोधात रचलेला कट असल्याचाही आरोप केला आहे. सीक्रेट सर्विस द्वारे या घटनांचा तपास केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केलं. सोशल मीडिया वेबसाइट ट्रुथ सोशलवर हा दावा करत या तीन घटना म्हणजे ‘तीन षड्यंत्र’ असल्याचं वर्णनही ट्रम्प यांनी केलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होण्यासाठी ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये गेले होते, मात्र तिथे त्यांनी संयुक्त राष्ट्रांवर टीका करणारे भाषण दिले. ही संघटना आपली क्षमता वाया घालवत असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी त्यांनी युरोपियन मित्र राष्ट्रांवरही निशाणा साधला. तसेच त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध आणि स्थलांतरितांच्या स्वीकृतीवर त्यांच्या धोरणांवरही टीका केली. त्यांचे देश ‘नरकात जात आहेत’ असेच ट्रम्प यांनी जागतिक नेत्यांना ,ुनावल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधात घडलेल्या तीन घटनांचा उल्लेख करताना हा आपल्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप ट्रम्प यांनी पुन्हा केला. काय आहेत त्या तीन घटान, नेमकं घडलं तरी काय हे जाणून घेऊया..
पहिली घटना : एस्केलेटर खराब
ट्रम्प यांच्या सांगण्यानुसार, पहिली घटना ते आणि त्यांची टीम संयुक्त राष्ट्रांमध्ये एस्केलेटरवर असताना घडली. एस्केलेटर अचानकपणे “धाडकन थांबला.” हा स्पष्ट कट असल्याच” दावा ट्रम्प ायंनी केला. जबाबदार असलेल्यांना अटक केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. मात्र, संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले की, ट्रम्पच्या पुढे धावणाऱ्या अमेरिकन प्रतिनिधी मंडळातील एका व्हिडिओग्राफरने चुकून एस्केलेटरच्या स्टॉप मेकॅनिझमला स्पर्श केला असावा, ज्यामुळे ते थांबले असावे असे त्यांनी नमूद केलं.
दुसरी घटना : टेलीप्रॉम्प्टर बंद
त्यांच्या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्प्टर “अचानक बंद झाला” असे म्हणत ट्रम्प यांनी दुसऱ्या घटनेचा उल्लेख केला. मात्र, यासंदर्भात, संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, टेलिप्रॉम्प्टर संयुक्त राष्ट्रांकडून नव्हे तर व्हाईट हाऊस टीमद्वारे चालवले जात होते. पण हा देखील एका कटाचा भाग असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.
तिसरी घटना : आवाजात गडबड
ट्रम्प यांची तिसरी तक्रार होती की, संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांच्या भाषणादरम्यान आवाजाची गुणवत्ता खराब होती. त्यांनी सांगितले की, लोकांच्या इअरपीसमध्ये अनुवादक होते, तेव्हाच त्यांना त्यांचे शब्द ऐकायला येऊ शकले. माझी पत्नी मेलानिया हिनेही मला सांगितलं की तिला भाषण ऐकू आलं नाही, असा दावाही ट्रम्प यांनी केला.
हा योगायोग नव्हे तर कट आहे
या तिन्ही घटना योगायोगाने घडल्या नसून तो एक कट असल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. त्यांनी संयुक्त राष्ट्रांना एस्केलेटर घटनेशी संबंधित सुरक्षा टेप्स जतन करण्याची विनंती केली, जेणेकरून गुप्त सेवा त्याची चौकशी करू शकेल. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘हा योगायोग नव्हता, हा एक कट होता.’ या दाव्यांमुळे ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र या घटना तांत्रिक बिघाड असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे, पण हा आपल्याविरोधातील कटच आहे असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.