
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. टॅरिफच्या निर्णयामुळे अनेक देशांच्या निर्यातीवर थेट परिणाम झाल्याचं पाहिलं गेलं आहे. भारतावरही अमेरिकेने 50 टक्के कर लादला आहे. त्यामुळे अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारताच्या निर्यात नितीवर प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, अमेरिकेचा दबाव झिडकारून लावण्यासाठी रशिया, चीन आणि भारत यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित होताना दिसत आहेत. असं असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी नवं कार्ड बाहेर काढलं आहे. आता चीनला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध विकोपाला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्यूंग यांच्या समोर चीनला थेट धमकी दिली आहे.
चीनने अमेरिकेला दुर्मिळ मॅग्नेट पुरवावे अन्यथा संभाव्य 200 टक्के टॅरिफसाठी सज्ज व्हावे. हा इशारा व्यापार वादाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. “आम्हाला त्यांच्यावर 200 टक्के किंवा त्यासारखे काहीतरी शुल्क लावावे लागेल.”, असं ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्र्म्प यांनी पुढे सांगितलं की, माझ्याकडे काही असे पत्ते आहेत की ते काढले तर चीन देशोधडीला लागेल. “चीनसोबत आमचे चांगले संबंध असतील. त्यांच्याकडे काही पत्ते आहेत. आमच्याकडे त्यांच्यापेक्षा अधिक चांगले पत्ते आहेत, पण मला हे पत्ते खेळायचे नाहीत. जर मी हे पत्ते काढले तर ते चीनचा नाश होईल. मी हे पत्ते खेळणार नाही.”, असा धमकीवजा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार विराम 90 दिवासांसाठी वाढवला आहे. 12 ऑगस्ट रोजी अमेरिका आणि चीनने व्यापार युद्धविराम वाढवण्यावर सहमती दर्शवलीह होती. कारण दोन्ही देशाच्या करारावर चर्चा होऊ शकते. ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रापती शीन जिनपिंग यांच्याशी नुकतीच चर्चा केली. तसेच बीजिंगला भेट देण्याचा विचार करत असल्याचं देखील सांगितलं.’या वर्षी किंवा त्यानंतर लवकरच चीनला जाऊ.’, असं ट्रम्प यांनी सांगितलं.