
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे पूर्णपणे उद्धवस्थ केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली. दोन्ही बाजूंकडून बॉम्ब हल्ले सुरू होती. यादरम्यान भारताने पाकिस्तानचे ड्रोन हवेतच पाडले. रशियाकडून भारताने खरेदी केलेल्या क्षेपणास्त्रांनी यावेळी आपली ताकद दाखवली. मात्र, त्यावेळी आरोप केला गेला की, भारताविरोधात पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर सुरू असताना युक्रेनने मदत केली आणि रशियात धुमाकूळ घालणारे युक्रेनी ड्रोन पाठवले. भारत आणि युक्रेनचे संबंध कायमच चांगली राहिली आहेत. मात्र, पाकिस्तानला ड्रोनची मदत युक्रेनने केल्याचा काही रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
हेच नाही तर रशिया युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारताबद्दल मोठे विधान करत म्हटले होते की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशियाला युद्धासाठी मोठा पैसा मिळत आहे. आता रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या दाैऱ्यानंतर झेलेन्स्की हे देखील भारत दाैऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वी आता युक्रेनकडून पाकिस्तानला ड्रोन पुरवण्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यात आले.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना युक्रेन सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, युक्रेनने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचे ड्रोन दिली नाहीत. इतर देशांप्रमाणेच पाकिस्ताननेही काही वर्षांपूर्वी युक्रेनकडून ड्रोन तंत्रज्ञान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. युक्रेनियन अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानसोबत चर्चा होऊनही, ड्रोन किंवा ते बनवण्याचे तंत्रज्ञान कधीही पुरवले गेले नाही.
युक्रेनच्या ड्रोन उद्योगाने किंवा त्याच्या राजकीय नेतृत्वाने पाकिस्तानला लष्करी दर्जाचे ड्रोन विकण्याची परवानगी कधीही दिली नव्हती, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात होते आणि पाकिस्तान सातत्याने भारतावर ड्रोन हल्ला करत होता, त्यावेळी असे सांगितले जात होते की, भारताच्या विरोधात शक्तीशाली ड्रोन युक्रेनने पाकिस्तानला पुरवले आहेत. मात्र, त्यावेळी युक्रेनने यावर भाष्य करणे टाळले, आता झेलेन्स्की यांच्या भारत दाैऱ्यापूर्वी यावर भाष्य करण्यात आले.