
महाराष्ट्रात कोंबड्यामध्ये बर्ड फ्लू आढळला आहे. परंतु अमेरिकेतून नवीन बातमी समोर आली आहे. अमेरिकेत अंडी प्रचंड महाग झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा मोठ्या प्रमाणावर कापला जात आहे. परिणामी अनेकांनी आपल्या रोजच्या आहारातून अंडी बाद केली आहे. या संकटावर मात करण्यासाठी तेथे नवीनच आयडिया काढण्यात आली आहे. चक्क कोंबड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. त्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे.
न्यू हॅम्पशायर येथील गॉफस्टाउन राहणारे क्रिस्टीन आणि ब्रायन टेम्पलटन यांनी अंड्याच्या समस्येवर एक अनोखा उपाय शोधला आहे. त्यांनी ‘रेंट द चिकन‘ सेवा सुरु केली आहे. या सेवेअंतर्गत लोक कोंबडी भाड्याने घेऊ शकतात आणि ताजी अंडी त्यांच्या घरात मिळू शकतात.
अमेरिकेत अंड्यांच्या किंमती का वाढल्या? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचे सर्वात मोठे कारण बर्ड फ्लू आहे. या आजारामुळे लाखो कोंबड्या माराव्या लागल्या. तसेच कोंबड्यांचे खाद, विक्री प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणी हे अंडी महाग होण्यास कारणीभूत आहेत. अमेरिकेच्या अनेक राज्यांत अंड्यांच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत.
अंड्यांच्या वाढत्या किंमतीवर क्रिस्टीन आणि ब्रायन टेम्पलटन यांनी पर्याय निर्माण केला आहे. त्या ठिकाणी ‘रेंट द चिकन’ सेवा वेगाने लोकप्रिय होत आहे. या सेवेनुसार सहा महिन्यांसाठी कोंबडी भाड्याने घेता येते. या कालावधीत दोन कोंबड्या मिळतात. सोबत कोंबड्यांना लागणारे खाद्य आणि तिचे संगोपन कसे करावे? त्याची माहिती दिली जाते. त्यासाठी जवळपास 600 अमेरिकी डॉलर (जवळपास 47,688 रुपये) भाडे आकारले जात आहे. भाड्याने घेतलेल्या दोन कोंबड्या दर आठवड्यास एक डझन अंडी देतात. त्यामुळे बाजारातून महाग अंडी घेण्यापेक्षा ही अंडी घेणे लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे.
लोकांना ‘रेंट द चिकन’ ही कल्पना खूप आवडली आहे. बरेच भाडेकरू कोंबड्यांशी इतके जोडले जातात की सहा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर ते कोंबड्या परत करण्याऐवजी विकेत घेऊन टाकत आहे. या सेवेमुळे लोकांची महाग अंड्याची समस्या सुटली आहे.