
अमेरिका आणि इराण युद्धाला आता 15 दिवस होऊन गेले. इराणवर इस्त्रायल आणि अमेरिका मोठे हल्ले करत आहे. मात्र, इराण धैर्याने या युद्धाला सामोरे जात आहे. इराणचे मोठे नुकसान झाले असून आम्ही शेवटपर्यंत लढणार असल्याचे अगोदरच इराणकडून स्पष्ट करण्यात आले. यादरम्यानच अमेरिकेला या युद्धात मोठा धक्का बसताना दिसत आहे. इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आला, ज्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. हेच नाही तर तेलाचा तुटवडा निर्माण झाला. यादरम्यान अमेरिकेने जपान, फ्रान्स, चीन, ब्रिटन, दक्षिण कोरिया या देशांकडे मदत मागत त्यांच्या युद्धनाैका होर्मुजा खाडीत पाठवाव्यात असे म्हटले. फक्त मदतच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले होते की, मला विश्वास आहे की, हे देश मदतीला येतील आणि त्यांच्या युद्धनाैका होर्मुज खाडीत पाठवतील.
डोनाल्ड ट्रम्प मदतीसाठी 5 देशांचे नाव घेतले. मात्र, आता एका मागून एक सर्वच देश हात वर करताना दिसत आहेत. या युद्धात त्यांना पडायचे नाही. हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्काच म्हणावा लागेल. होर्मुज खाडीत इराण आक्रमक भूमिकेत आहे. थेट जहाजे पेटवून दिली जात आहेत. काही देशांसाठीच इराणकडून ही खाडी सुरू ठेवण्यात आली.
या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलला मदत करणाऱ्या देशांसाठी ही खाडी बंद ठेवण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात सापडले असून आणीबाणी लागण्याच्या स्थितीत आहेत. होर्मुज खाडीतून भारताचे जहाज सोडले जात आहेत. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत मागूनही अनेक देशांनी पाठ फिरवली आणि आपल्या युद्धनाैका पाठवणार नसल्याची भूमिका घेतली.
फ्रान्सने स्पष्ट सांगितले की, आमच्या देशाची युद्धानाैका होर्मुज खाडीत जाणार नाही. तर दुसरीकडे चीन आणि ब्रिटन यांनीही अमेरिकेला खो देत आपल्या युद्धनाैका होर्मुजमध्ये पाठवण्यास नकार दिला. अमेरिकेला चीनकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, चीनकडूनही मदत नाकारण्यात आली. हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका नक्कीच म्हणावा लागेल. यावर डोनाल्ड ट्रम्प काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.