Iran Attack On UAE : ड्रोन हल्ल्यानंतर भारत खवळला, इराणला सरळ सुनावलं ‘आम्हाला हे अजिबात मान्य नाही’
Iran Attack On UAE : मध्य पूर्वेत पुन्हा युद्ध सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. काल तशा घडामोडी घडल्या आहेत. इराणकडून काल संयुक्त अरब अमीरातवर हल्ला करण्यात आला. याची झळ भारतीयांना बसली.

इराणने काल संयुक्त अरब अमीरात UAE च्या फुजैराह पेट्रोलियम औद्योगिक प्रकल्पावर ड्रोन हल्ला केला. या ड्रोन हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले आहेत. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पेट्रोलियम साइटवरील हल्ल्यानंतर तिथे आग लागली. इराण-अमेरिकेत युद्धविराम झाल्यानंतर यूएईने काल पहिल्यांदा तीन मिसाइल्सचा अलर्ट जारी केला होता. इराणचं हे पाऊल भारताला अजिबात पटलेलं नाही. कारण त्यांच्या हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले तसचं यूएई भारताचा मित्र देश आहे. त्यामुळे भारताने इराणच्या या ड्रोन हल्ल्याच कठोर शब्दात निषेध केला आहे. “फुजैराह वरील हल्ला आणि त्यात भारतीयांचं जखमी होणं आम्हाला अजिबात मान्य नाही. नागरी पायाभूत प्रकल्प आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणं तात्काळ थांबवावं” अशी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.
“भारताने इराणचा निषेध करताना आपण चर्चेच्या बाजूने असल्याचं म्हटलं आहे. चर्चा आणि कूटनितीक मार्गाने या परिस्थितीतून मार्ग काढावा तरच पश्चिम आशियात शांतता आणि स्थिरता येईल” अशी भारताची भूमिका आहे. भारताने सागरी सुरक्षेवर सुद्धा आपलं मत मांडलं. सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजची इराण आणि अमेरिका दोन्ही देशांनी कोंडी केली आहे. त्यामुळे तिथून चालणारी जलवाहतूक बाधित झाली आहे. इराण बेकायदेशीररित्या हॉर्मुजमधून जाणाऱ्या तेल जहाजांवर टोल आकारत आहे.
इराणने किती मिसाइल्स डागली?
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कुठल्याही अडथळ्याशिवाय स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून मुक्तपणे व्यापारी जलवाहतूक सुरु राहिली पाहिजे अशी भारताची भूमिका आहे. शांततामय मार्गाने तोडगा काढण्यासाठी भारत साथ द्यायला तयार आहे असं भारताने म्हटलं आहे. जखमी भारतीयांवर उपचार सुरु असल्याची माहिती यूएईमधील भारतीय दूतावासाने दिली आहे. जखमी भारतीयांना चांगले उपचार मिळावेत, त्यांचं सर्व व्यवस्थित व्हावं यासाठी आम्ही स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात आहोत असं भारतीय दूतावासाने म्हटलं आहे. इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर पेट्रोलियम साइटवर आग भडकली. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने इराणने चार मिसाइल डागल्याची माहिती दिली. इराणने डागलेल्या चार पैकी तीन मिसाइल्सना एअर डिफेन्स सिस्टिमने नष्ट केलं. एक समुद्रात पडलं.