‘पाण्याशिवाय लाखो पाकिस्तानी मरतील…’, शाहबाज शरीफ, भारताने खडसावले, ‘आधी दहशतवाद बंद करा’

पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर भारताने पुन्हा आरसा दाखवला. सिंधू जल करार स्थगित करण्याचा मुद्दा पाकिस्तानकडून मांडण्यात आला होता. त्यावेळी भारताने कराराचा प्रमुख उद्देश दाखवत पाकिस्तानला शाब्दीक फटकारे लगावले.

पाण्याशिवाय लाखो पाकिस्तानी मरतील..., शाहबाज शरीफ, भारताने खडसावले, आधी दहशतवाद बंद करा
कीर्ती वर्धन सिंह, शाहबाज शरीफ
| Updated on: Jun 01, 2025 | 10:43 AM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानवर अनेक पातळयांवर कारवाई केली. सिंधू जल करार स्थगित केला. तसेच ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ नष्ट केले. या सर्वांचा परिणाम पाकिस्तानवर दिसून येत आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पाण्याचे महत्व समजले आहे. पाण्याशिवाय लाखो पाकिस्तानी मरतील, असे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर म्हटले आहे. त्याला भारताने ठोस उत्तर देत आधी दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे उद्योग बंद करण्याचे खडसावले आहे.

भारताने म्हटले आहे की, पाकिस्तानने सीमापार दहशतवाद पसरवून सिंधू जल कराराचे उल्लंघन केले आहे. सिंधू जल कराराच्या सुरुवातीला लिहिले आहे की, हा करार चांगल्या हेतूने आणि मैत्रीने करण्यात आला आहे. या कराराचे प्रामाणिकपणे पालन करणे खूप महत्वाचे आहे. परंतु सीमेपलीकडून होणारा दहशतवाद या कराराच्या अंमलबजावणीत अडथळा आणत आहे, असे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी म्हटले.

ताजिकिस्तानमध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर आरोप केला. ते म्हणाले, पाकिस्तान भारताला आयडब्ल्यूटी थांबवू देणार नाही. सिंधू जलकरार स्थगित करुन भारत लाखो लोकांचे जीवन धोक्यात आणत आहे. शाहबाज शरीफ यांना जोरदार उत्तर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दिले. ते म्हणाले, पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा चुकीचा वापर केला जातो. सिंधू जल कराराच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की, चांगला हेतू आणि मैत्री यामुळे हा करार केला जात आहे. परंतु पाकिस्तान भारताविरोधात दहशतवादी कारवाया करत असेल तर या कराराची अंमलबजावणी कशी होणार? या कराराचे प्रामाणिकपणे पालन करणे गरजेचे होते. मात्र, पाकिस्तानने दहशतवादी कारवाया आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देऊन हा करार धोक्यात आणला.

कीर्ति वर्धन सिंह यांनी म्हटले की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर पाकिस्तानकडून नेहमी अनावश्यक मुद्दे आणले जात आहे. या व्यासपीठाचा त्या मुद्यांशी संबंध नसताना ते उपस्थित केले जात आहे. पाकिस्तानच्या या प्रयत्नांचा आम्ही कठोर शब्दांत निषेध करतो.