
India us trade deal : भारत-अमेरिका संबंधात एक नवीन आणि ऐतिहासिक अध्याय सुरु होणार आहे. नुकताच दोन्ही देशात द्विपक्षीय व्यापार करार झाला. हा व्यापार करार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरु शकतो. एसबीआयच्या रिसर्चच्या ताज्या रिपोर्टनुसार, या डीलव्दारे अमेरिकेने आपले सर्व दरवाजे भारतासाठी उघडले आहेत. आता चेंडू भारताच्या कोर्टात आहे, आपण या संधीचा कसा फायदा उचलतो?. सर्व काही ठरलेल्या योजनेनुसार घडलं, तर भारतीय निर्यातक आणि व्यापाऱ्यांना पुढच्या काही दिवसात भरपूर नफा कमवता येईल.
या डीलचा सर्वाधिक परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे. एसबीआयच्या एका विश्लेषणानुसार या करारामुळे भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार सरप्लस म्हणजे 45 अब्ज डॉलरपर्यंत वाढू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, अमेरिकेकडून आपण जितकं सामना विकत घेणार, त्यापेक्षा जास्त त्यांना विकू शकतो. हा आकाडा इतका मोठा आहे की, भारताचा वर्षाचा एकूण सरप्लस 90 अब्ज डॉलरच्या पुढे जाऊ शकतो.
थेट परिणाम देशाच्या जीडीपीवर होईल
सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय सामनावर लावलेल्या टॅरिफमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. रेसिप्रोकल टॅरिफ 18 टक्क्यापर्यंत घटवण्यात आलाय. याचा अर्थ अमेरिकी बाजारात भारतीय सामान वियतनाम आणि अन्य आशियाई देशांच्या तुलनेत स्वस्त असेल. याचा थेट परिणाम देशाच्या जीडीपीवर दिसून येईल. त्यात 1.1 टक्के वाढीची अपेक्षा आहे.
भारत ती रिकामी जागा भरेल
अमेरिका जगातील सर्वात मोठा बाजार आहे. तिथे वर्षाला 3 ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त सामान आयात होतं. आतापर्यंत यात भारताची फक्त 3 टक्के हिस्सेदारी होती. पण लवकरच हे चित्र बदलणार आहे. रिपोर्टमध्ये अनमेट डिमांड म्हणजे अशा मागणीचा उल्लेख केलाय, जी अजूनपर्यंत पूर्ण करण्यात आली नव्हती. भारत ती रिकामी जागा भरेल.
मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठ अंतर
SBI च्या मते टॉप 15 प्रोडक्ट कॅटेगरीत भारताचं नशीब बदलू शकतं. यात इलेक्ट्रिकल मशीनरी, फार्मास्यूटिकल्स (औषधं), इंजीनिअरिंग सामान, रत्न-आभूषण आणि टेक्सटाइलचा समावेश आहे. या क्षेत्रात अमेरिकेची मागणी आणि भारताचा पुरवठा यामध्ये एक मोठं अंतर आहे. वार्षिक निर्यात क्षमता 100 अब्ज डॉलरचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे. हा फक्त मोठ्या कंपन्यांच नाही, तर या सेक्टर्समध्ये काम करणाऱ्या छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी सुद्धा विस्ताराची चांगली संधी आहे.
भारताच्या कुठल्या उत्पादनांचा फायदा?
मोठ्या ट्रेड डील्सचा फायदा कॉर्पोरेट जगतापर्यंत मर्यादीत मानला जातो. पण या डीलमध्ये भारतीय कृषी क्षेत्रासाठी सुद्धा चांगली बातमी आहे. या डील अंतर्गत भारताच्या जवळपास 75 टक्के कृषी निर्यातीवर अमेरिकेत कोणताही अतिरिक्त टॅरिफ लागणार नाही. याचा थेट लाभ शेतकरी, मच्छीमार आणि फळबागा मालकांना होणार आहे. तांदूळ, मसाले, चहा, कॉफी, काजू आणि सी फूड सारख्या उत्पादनांसाठी निर्यात अजून सोपी होईल. अमेरिका आधी भारताकडून आपल्या गरजेचा 25 टक्के तांदूळ विकत घेत होता. कमी शुल्कामुळे तिथे भारतीय उत्पादनांची मागणी वाढेल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत परदेशी मुद्रेचा प्रवाह वाढेल.