इराण-अमेरिका युद्धाचा महाभडका ! ड्रोन पाडल्याचा दावा, तेल टँकर्सना आग; होर्मुझ बंद?

इराणने बुशेर येथे 3.4 कोटी डॉलर्स किमतीचे अमेरिकेचे MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी नौदलाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोन तेलवाहू जहाजांना (टँकर्सना) सुरुंगांची धडक बसल्याने आग लागली.

इराण-अमेरिका युद्धाचा महाभडका ! ड्रोन पाडल्याचा दावा, तेल टँकर्सना आग; होर्मुझ बंद?
इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटलं
| Updated on: Jul 18, 2026 | 7:15 AM

अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेला संघर्ष आता अत्यंत विनाशकारी वळणावर येऊन पोहोचला आहे. या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अनेक मोठे दावे केले आहेत. इराणी प्रसारमाध्यमे आणि ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) च्या म्हणण्यानुसार, इराणने बुशेर (Bushehr) शहराच्या आकाशातून उड्डाण करणाऱ्या अमेरिकेच्या ‘MQ-9 रीपर’ (MQ-9 Reaper) हा ड्रोन पाडला आहे. सुमारे 34 दशलक्ष डॉलर्स किंमत असलेले हे ड्रोन अवघ्या काही क्षणांत नष्ट केल्याचा दावा इराणी प्रसारमाध्यमांनी केला असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. हे विनाशकारी युद्ध आता अखेर कधी थांबणार हाच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. दरम्यान,होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दक्षिणेस ‘माइनफील्ड’मधून (सुरुंग पेरलेल्या क्षेत्रातून) जात असताना दोन तेल टँकर्सवर स्फोट झाले अन् त्यांना आग लगाल्याचा दावाही इराणचा सरकारी टीव्ही आणि तस्नीम (Tasnim) वृत्तसंस्थेने केला आहे. एवढंच नव्हे तर कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकन तळ व छावण्यांना लक्ष्य केल्याचा दावा इराणच्या लष्कराने केला आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी असुरक्षित ?

इराणी माध्यमांच्या दाव्यानुसार, अमेरिकेने डझनभर हवाई संरक्षण (एअर डिफेन्स) क्षेपणास्त्रे डागूनही इराणच्या क्षेपणास्त्रांनी जॉर्डनमधील मुवाफ्फक साल्टी एअर बेसवर हल्ला केला. या तळावर अमेरिकन सैन्य तैनात असल्याचे सांगितलं जात आहे. राणी नौदलाने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून दोन्ही तेलवाहू टँकर पुढे सरकले. त्यानंतर ते कथितपणे सागरी सुरंग (माइन्स) असलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्याचे म्हटले जाते. अमेरिकेच्या लष्करी कारवाईमुळे होर्मुझ सामुद्रधुनी (Hormuz Strait) आता पूर्णपणे असुरक्षित झाली असून ती बंद करण्यात आली असल्याचा दावा इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने केला आहे.

तेलबाजारात उडणार खळबळ ?

अमेरिकेच्या आक्रमक कारवायांमुळे आणि हल्ल्यांमुळे होर्मुझ सामुद्रधुनी सध्या “अत्यंत असुरक्षित असून पूर्णपणे बंद” आहे असं इराणच्या सरकारी माध्यम तस्नीमने IRGC च्या नौदलाच्या हवाल्याने म्हटलं आहे. इराणी नौदलाने यापूर्वीच या मार्गाने जहाजांनी प्रवास करू नये, असा इशारा दिला होता. मात्र, दोन्ही तेलवाहू टँकरांनी हा इशारा दुर्लक्षित केला. या घटनेनंतर जागतिक तेलबाजारात मोठी खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इराणमधील यज्द आणि अहवाज शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले

समुद्र आणि आकाशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकन हवाई दलाने इराणच्या मुख्य भूभागावरील हल्ल्यांची व्याप्ती वाढवल्याचे वृत्त आहे. इराणी माध्यमांच्या अहवालानुसार, देशातील अनेक भागांत सलग मोठे स्फोट झाले आहेत.

यज्द प्रांत : इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेनुसार, मध्य इराणातील ऐतिहासिक यज्द शहरात एकामागून एक पाच मोठे स्फोट झाले.

फार्स प्रांत : दक्षिण-पश्चिमेकडील फार्स प्रांतातील लास परिसराच्या बाहेरील भागातही मोठा स्फोट झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

अहवाज : इराणच्या मेहर वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण-पश्चिम खुजेस्तान प्रांतातील प्रमुख शहर अहवाजवर अमेरिकन क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केला असून, स्थानिक अधिकाऱ्यांनीही त्याची पुष्टी केल्याचा दावा करण्यात आला आहे.

चहूबाजूंनी होणारे मिसाईल हल्ले, ड्रोन पाडणं आणि तेलवाहू टँकरांना लागलेली आग यामुळे संपूर्ण आखाती प्रदेश अत्यंत तणावपूर्ण स्थितीत पोहोचल्याचे बोललं जात आहे.

Follow Us