
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका सर्वच देशांना बसत आहे. भारताने या युद्धाबाबत आपली भूमिका अगोदरच स्पष्ट केली. युद्ध थांबवण्याकरिता अनेक देश विनंती करत आहेत. मात्र, युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. या युद्धादरम्यान अमेरिका अडचणीत सापडली असून थेट रशियाकडून तेल खरेदी करण्यास जगातील देशांना अमेरिकेने सांगितले. होर्मुज मार्ग इराणकडून बंद करण्यात आल्याने अमेरिकेवर मोठा दबाव आहे. हा मार्ग लवकरात लवकर सुरू करा नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी अगोदरच अमेरिकेने दिली. यामध्येच इराणच्या महत्वाच्या बेटावर अमेरिकेने घातक हल्ला केला. मात्र, त्यानंतरही इराणचे धैर्य खचले नसून इराणकडूनही याचा बदला म्हणून मोठे हल्ले आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळांवर केले जात आहेत. आता पुन्हा अमेरिकन दूतावासालाही टार्गेट केले जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याने इराणच्या खार्ग बेटावर जोरदार बॉम्बहल्ला केला आणि लष्कर तळांना नष्ट केल्याचे म्हटले. यावर आता इराणकडून जोरदार प्रतिउत्तर अमेरिकेला देण्यात आले. इराणकडून जगाची झोप उडवणारी थेट धमकीच देण्यात आली. इराणच्या खातम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की, जर तेल, आर्थिक किंवा ऊर्जा सुविधांवर हल्ला झाला तर इराण लगेचच प्रतिउत्तर देईल.
खळबजनक म्हणजे त्यांनी पुढे म्हटले की, आमचे तेल, आर्थिक आणि ऊर्जा संबंधित पायाभूत सुविधांवर हल्ला झाला तर संपूर्ण प्रदेशातील अमेरिकेची भागीदारी असलेल्या किंवा अमेरिकेला पाठिंबा देणाऱ्या कंपन्यांना आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांवर मोठे हल्ले करून प्रतिउत्तर हल्ला करू.
खार्ग बेटावर हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिकन सैन्याने मध्य पूर्वेत 2500 सैन्य आणि एक प्राणघातक जहाज तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. खार्ग बेट इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे. तिथेच मोठा हल्ला करण्यात आल्याने इराणकडून मोठी धमकी देण्यात आली. आता थेट अमेरिकेसोबत संबंधित आणि या युद्धात त्यांच्या पाठिंबा देणाऱ्या कंपन्यांवर हल्ला करण्याचा इशारा इराणकडून देण्यात आला.