Iran vs Israel : इराण-इस्रायलमध्ये भारताचा खास कोण? आपल्याला कोणाची जास्त गरज?

Iran vs Israel : इस्रायलची भारताला जितकी गरज आहे, तितकीच इराणची सुद्धा आहे. पण या दोन देशांपैकी जास्त कोण खास? हा प्रश्न येतो. भारताचे दोन्ही देशांसोबत पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण आताच्या स्थितीत वेळ पडल्यास कोणाला साथ देणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

Iran vs Israel : इराण-इस्रायलमध्ये भारताचा खास कोण? आपल्याला कोणाची जास्त गरज?
Iran Israel
| Updated on: Oct 02, 2024 | 11:36 AM

इराण-इस्रायलमधील तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देश युद्धासाठी आतुर आहेत. हमास चीफ हानिया आणि हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाहच्या मृत्यूनंतर इराण इस्रायलवर पलटवार करणार अशी शक्यता होती, तसचं घडलं. मंगळवारी इराणने इस्रायलवर जवळपास 200 मिसाइल्स डागली. इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढणं भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. मिडिल ईस्टमधल्या या दोन्ही देशांसोबत भारताचे चांगले संबंध आहेत. पण दोन देशांपैकी जास्त जवळचा कोण? असा विषय येतो, त्यावेळी इस्रायल इराणवर मात करतो. मागच्या पाच वर्षात भारत आणि इस्रायलमध्ये व्यापार दुप्पट झाला आहे. त्याचवेळी इराणसोबत व्यापार कमी झालाय.

व्यापार वाढणं हे दोन्ही देशांमधील संबंध मजबूत होण्याचं लक्षण आहे. इस्रायलने आतापर्यंत कधीही भारताविरोधात वक्तव्य केलेलं नाही. इस्रायलने कधीही भारताच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. पण इराणच असं नाही. इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांनी भारताच्या मुस्लिमांबद्दल चिंता व्यक्त केली होती. मुस्लिमांच्या अधिकारांच उल्लंघन होणाऱ्या देशांमध्ये त्यांनी भारताचा समावेश केला होता. खामेनेई यांनी भारतावर मुस्लिमांना त्रास दिल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर इराणने आपला रेकॉर्ड तपासावा असं भारताने म्हटलं होतं.

इराणची वेळोवेळी काय भूमिका होती?

त्याशिवाय 2020 साली दिल्लीत झालेल्या दंगलीवर सुद्धा अयातुल्ला अली खामेनेई बोलले आहेत. त्यांनी दंगलीला मुस्लिमांचा नरसंहार ठरवलेलं. खामेनेई यांनी जम्मू-कश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवण्यावर सुद्धा प्रतिक्रिया दिली होती. कश्मीरमधील मुस्लिमांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. आमचे भारतासोबत चांगले संबंध आहेत. पण भारत सरकार काश्मिरी जनतेसाठी योग्य पावलं उचलेल आणि या भागातील मुस्लिमांचा त्रास कमी होईल अशी अपेक्षा इराणने व्यक्त केली होती. म्हणजे इराणने वेळोवेळी धर्माच्या आधारावरुन भारतावर टीका केली आहे. म्हणूनच या दोन देशांपैकी इस्रायल भारताच्या जास्त जवळ आहे. कारण इस्रायल भारताचा मोठा संरक्षण भागीदार सुद्धा आहे.