इराणविरोधात युद्धाचा भडका, इस्त्रायलचे पंतप्रधान कोणतं वाचताय पुस्तक? नेतन्याहू यांचा फोन कॉलचा फोटो व्हायरल

Benjamin Netanyahu Book: इराणविरोधातील युद्धाचा भडका उडालेला असताना इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही नेत्यांचा फोनवर बोलतानाचा क्षण कैद झाला आहे. याच फोटोत नेतन्याहू यांच्या टेबलवरील एका पुस्तकांकडे लोकांचे लक्ष वेधले आहे.

इराणविरोधात युद्धाचा भडका, इस्त्रायलचे पंतप्रधान कोणतं वाचताय पुस्तक? नेतन्याहू यांचा फोन कॉलचा फोटो व्हायरल
बेंजामिन नेतन्याहू
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 08, 2026 | 11:31 AM

Iran-Israel-US War: मध्य-पूर्वेत इराणविरोधात युद्धाचा भडका उडालेला आहे. इस्त्रायल आणि अमेरिका या देशावर हल्ले चढवत आहेत. तर इराणही त्याला प्रत्युत्तर देत आहे. या युद्धादरम्यान एक छायाचित्र सध्या समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात संभाषण होताना कैद करण्यात आला आहे. पण या फोटोत नेतन्याहू यांच्या टेबलवरील एका पुस्तकांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. या युद्धादरम्यान नेतन्याहू हे कोणते पुस्तक वाचत आहेत?

पहिल्यांदा या फोटोकडे पाहताना हा एक सामान्य फोटो वाटतो. पण या फोटोत लक्ष दिल्यावर नेतन्याहू यांच्या टेबलवर एक पुस्तक ठेवल्याचे दिसते. या फोटोत टिम बॉवेरी यांचे पुस्तक दिसतं. “Allies at War: How the Struggles Between the Allied Powers Shaped the War and the World” हे पुस्तक त्यांच्या टेबलवर दिसले. त्यानंतर समाज माध्यमांवर आणि विश्लेषकांमध्ये या पुस्तकाची एकच चर्चा सुरू झाली आहे.

28 फेब्रुवारी रोजीचा फोटो

हा फोटो 28 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आला आहे. त्यावेळी अमेरिका आणि इस्त्रायल या देशाने इराणवर पहिली संयुक्त कारवाई केली. संयुक्त हल्ला चढवला. या फोटोत नेतन्याहू हे फोनवर ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत. नेतन्याहू यांच्या टेबलवर एक मोठा प्रादेशिक नकाशा दिसतो. त्याच्याजवळच हे पुस्तक ठेवलेले दिसते. इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने आणि टाइम्स ऑफ इस्त्रायलने हा फोटो विविध माध्यमांवर प्रसारित केला होता.

त्या पुस्तकात असे काय?

या फोटोत टिम बॉवेरी यांचे “Allies at War: How the Struggles Between the Allied Powers Shaped the War and the World” हे पुस्तक त्यांच्या टेबलवर दिसते. जून 2025 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले होते. दुसर्‍या महायुद्धात दोस्त राष्ट्र ब्रिटेन, अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत संघा दरम्यान संबंध कसे होते. राजकीय संबंध आणि अंतर्गत वाद काय होते याचे वर्णन या पुस्तकात करण्यात आलेले आहे. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विस्टन चर्चिल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट, रशियाचे जोसेफ स्टॅलिन यांच्यातील अविश्वास, स्पर्धा आणि विविध राजकीय मुद्दांवर मतभेद असतानाही शत्रूविरोधात(जर्मनी) हे तीनही राष्ट्र एकत्रित लढले होते. त्याची चर्चा या पुस्तकात करण्यात आली आहे.

पुस्तकाच्या माध्यमातून संकेत?

सध्या रशिया हा इराणला अमेरिकन सैन्य तळ आणि तिथल्या लष्करी हालचालींची गुप्त माहिती देत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचवेळी बेंजामिन नेतन्याहू यांच्या टेबलवरील या पुस्तकाने मोठे संकेत दिले आहेत असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. हिटलवरविरोधात जशी सर्व राष्ट्र एकत्रित आलीत. आता इराणविरोधात सर्व राष्ट्रांनी असंच एकत्रित यावं असे हे संकेत मानल्या जात आहे. सध्या अरब राष्ट्रांनी या युद्धात जी भूमिका घेतली आहे, ती या पुस्तकाला अनुकूल असल्याचे दिसून येत आहे.

Follow Us