इराण-इस्रायल युद्ध थेट तुमच्या दाराशी, महाराष्ट्राला दुहेरी फटका, नेमकं काय घडलं?

इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्राला दुहेरी फटका बसला असून पुण्यात गॅस टंचाईमुळे १८ शवदाहिन्या बंद करण्यात आल्या आहेत, तर माढ्यात ७ कोटींची निर्यातक्षम केळी अडकून पडली आहे.

इराण-इस्रायल युद्ध थेट तुमच्या दाराशी, महाराष्ट्राला दुहेरी फटका, नेमकं काय घडलं?
Iran Israel War
| Updated on: Mar 09, 2026 | 9:34 AM

सध्या आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांचे मोठे नुकसान होत आहे. इराण आणि इस्रायल दरम्यान भडकलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट महाराष्ट्राच्या जनजीवनावर उमटू लागले आहेत. या आंतरराष्ट्रीय युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक इंधन टंचाईचा फटका पुणे महानगरपालिकेच्या अंत्यसंस्कार व्यवस्थेला बसला आहे. तर दुसरीकडे सोलापूरच्या माढा तालुक्यातील निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

गॅस टंचाईमुळे १८ शवदाहिन्या बंद

आखाती देशांतील युद्धामुळे जागतिक स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम पुणे शहराच्या गॅस पुरवठ्यावर झाला असून शहरात गॅसचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. गॅस उपलब्ध नसल्याने पुणे महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील तब्बल १८ गॅस शवदाहिन्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा तातडीचा निर्णय घेतला आहे.

अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि मृतात्म्याला ताटकळत ठेवावे लागू नये, यासाठी प्रशासनाने लाकडी चिता हा पारंपारिक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. गॅस पुरवठा सुरळीत होईपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार आहे. यासाठी प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

७ कोटींची केळी कोल्ड स्टोरेजमध्ये अडकली

तर दुसरीकडे, युद्धाचा थेट आणि मोठा फटका सोलापूरच्या कृषी क्षेत्राला बसला आहे. माढा तालुका हा आखाती देशांत केळी निर्यातीचे मोठे केंद्र आहे. मात्र युद्धामुळे आंतरराष्ट्रीय जलमार्ग आणि निर्यात व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. माढा तालुक्यातील निर्यातक्षम केळीचे जवळपास १२०० कंटेनर सध्या अडकून पडले आहेत. सुमारे ७ कोटी रुपये किंमतीचा हा माल सध्या कोल्ड स्टोरेज आणि बॉक्समध्ये पॅकिंग करून पडून आहे. निर्यात थांबल्याने कोल्ड स्टोरेजच्या बाहेर कंटेनरच्या रांगा लागल्या असून माल खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.

युद्धामुळे आमचा हक्काचा आखाती बाजार बंद झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी कृषीनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष नितीन कापसे यांनी केली आहे.

एकीकडे पुणे शहरात अंत्यसंस्कारासारख्या मूलभूत सुविधेवर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आखाती देशांमधील हे युद्ध जितके लांबेल, तितका हा फटका अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

Follow Us