G7 परिषद सोडून ट्रम्प लवकर परतणार, तेहरान रिकामे करा, इराणला इशारा, काय मोठा हल्ला होणार?

Iran-Israel War : इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे लोक तेहरान सोडून जात आहे. यामुळे रविवारी तेहरानमधील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आता ट्रम्प यांच्या विधानानंतर हे स्थलांतर आणखी वाढले आहे.

G7 परिषद सोडून ट्रम्प लवकर परतणार, तेहरान रिकामे करा, इराणला इशारा, काय मोठा हल्ला होणार?
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: Jun 17, 2025 | 7:35 AM

Israel-Iran Conflict Updates: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कॅनडा दौऱ्यावर आहे. कॅनड्यात होणाऱ्या जी 7 परिषदेत ते सहभागी होणार आहे. परंतु नियोजित दौरा पूर्ण न करता ते लवकर परतणार आहे. इराण-इस्त्रायल संघर्षामुळे ट्रम्प अमेरिकेत परतणार आहे. व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी सोशल मीडिया पोस्टवर यासंदर्भात माहिती दिली.

G7 शिखर परिषदेसाठी कॅनडाला रवाना होण्यापूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे इराणमध्ये खळबळ उडाली आहे. इस्रायल आणि इराणकडून एकमेकांवर सुरू असलेल्या हल्ल्यांदरम्यान, ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी इराणला अणू करारावर स्वाक्षरी करायला सांगितली होती. त्यावर इराणने स्वाक्षरी करायला हवी होती. इराणकडे अण्वस्त्र असणार नाही, हे मी वारंवार सांगितले आहे. आता प्रत्येकाने ताबडतोब तेहरान सोडले पाहिजे. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर इराणवर मोठा हल्ला होणार की काय? अशी शक्यता व्यक्त होत आहे. इस्रायलने आधीच तेहरानमध्ये अनेक मोठे हल्ले केले आहेत, ज्यात लष्करी तळ तसेच नागरी इमारतींना लक्ष्य करण्यात आले आहे.

इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे लोक तेहरान सोडून जात आहे. त्यामुळे रविवारी तेहरानमधील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. आता ट्रम्प यांच्या विधानानंतर हे स्थलांतर आणखी वाढले आहे. सीबीएसच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, इराणवरील इस्रायली हल्ल्यात त्यांचा सहभाग नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला बैठक बोलावण्याचे निर्देश दिले असले तरी, याचा अर्थ असा नाही की वॉशिंग्टन हल्ल्यांमध्ये सहभागी असणार आहे.

इस्रायलने इराणच्या अणु केंद्र आणि लष्करी तळांवर शुक्रवार १३ जून रोजी हल्ले केले होते. त्यानंतर इराणकडूनही पलटवर करण्यात आला. आता दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. युद्धाच्या पाचव्या दिवसापर्यंत सुमारे ३० इराणी लष्करी अधिकारी आणि शास्त्रज्ञांसह सुमारे २३० लोक मृत्यू झाला आहे. तसेच १२०० हून अधिक जखमी झाले आहेत. इराणमधील अनेक रुग्णालय भरली आहेत.