
गेल्या पंधरा दिवसांपासून इराणविरोधात इस्त्रायल आणि अमेरिका एकवटले आहेत. दोन्ही देश मिळून इराणवर प्राणघातक हल्ले करताना दिसत आहेत. इराण देखील दोन्ही देशांना सडेतोड उत्तर देत आहे. मात्र, या युद्धामुळे जगात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने इंधन तुटवड्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आता इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुझबाबत मोठे विधान केले आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) संदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ही सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केलेली नाही, तर फक्त शत्रू राष्ट्रे आणि त्यांच्या मित्र देशांच्या जहाजे व तेल टँकर्ससाठी बंद आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांना आणि टँकर्सना निर्बंध नसून, सामान्य वाहतूक सुरू आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर अब्बास अराघची यांनी सांगितले की, “होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. ती फक्त आमच्या शत्रूंना – म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र देशांच्या जहाजे आणि टँकर्सना – बंद आहे. इतर सर्वांसाठी ती खुली आहे.” हे विधान त्यांनी MS Now या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केले. भारताची दोन तेल वाहतूक करणारी जहाजे याच मार्गांनी सुखरुप मायदेशी आली होती. त्यामुळे कदाचित येत्या काळात हा मार्ग भारतासाठी इराणकडून खुला करण्यात येईल.
याशिवाय, अराघची यांनी इशारा दिला की, जर इराणच्या तेल डेपो, ऊर्जा केंद्र किंवा इतर महत्त्वाच्या सुविधांवर हल्ले झाले तर यापेक्षा मोठे आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. युद्धाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या वस्ती असलेल्या भागांना प्राधान्याने संरक्षण देण्याचेही त्यांनी सांगितले. इराणने संयुक्त अरब अमिराती (UAE) ला थेट इशारा दिला आहे. इराणच्या माध्यमांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी UAE मधील प्रमुख बंदरांच्या परिसरातील लोकांना त्वरित रिकामे करण्याचे आवाहन केले आहे. यात दुबईतील जेबेल अली बंदर (Jebel Ali), अबुधाबीतील खलिफा बंदर (Khalifa Port) आणि फुजैरा बंदर (Fujairah Port) यांचा समावेश आहे. इराणचा दावा आहे की, अमेरिकेने या बंदरांमधील किंवा गुप्त ठिकाणांमधून इराणच्या खार्ग बेट (Kharg Island) वरील हल्ले केले आहेत. त्यामुळे हे ठिकाणे वैध लक्ष्य बनले असून, तेथे अमेरिकी सैन्य लपले असल्याचा आरोप आहे. इराणने UAE मधील अमेरिकी सैन्य असलेल्या विमानतळांच्या शहरांवरही हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित आणि खुली ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची मागणी केली आहे. त्यांनी चीन, जपान, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, दक्षिण कोरिया यासारख्या देशांना युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, “अनेक देश, विशेषतः ज्यांना इराणच्या बंदीचा फटका बसतो आहे, ते अमेरिकेसोबत युद्धनौका पाठवतील.” इराणच्या या भूमिकेनंतर इतर देश ट्रम्प यांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.