संताप, आक्रोश, सुडाग्नी पेटला…; अमेरिकेचा व्याजासहीत बदला घेणार, इराणची थेट धमकीच

अमेरिकेने इराणच्या अणु तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेला तीव्र प्रतिक्रिया देण्याचा इशारा दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला थेट धमकीच दिली आहे. इराण बहरीनमधील अमेरिकन नौदलावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे.

संताप, आक्रोश, सुडाग्नी पेटला...; अमेरिकेचा व्याजासहीत बदला घेणार, इराणची थेट धमकीच
Iran Threatens Retaliation Against US
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 22, 2025 | 11:27 AM

इराण-इस्रायल युद्धाबद्दलच्या चर्चा आणि त्याचे परिणाम आता जगभरात होत आहेत.आता या युद्धात एन्ट्री केली आहे ती अमेरिकेने. यानंतर, इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणच्या अणु तळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि रेव्होल्यूशनरी गार्ड्स आर्मीने गंभीर परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेला ईराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांची थेट धमकी 

अमेरिकेच्या या कृतीला उत्तर देण्याची थेट धमकीच ईराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी रिवॉल्यूशनरी गार्ड्स आर्मीच्या वतीने दिली आहे. ते म्हणालेत की, ‘अमेरिकेला यापूर्वी कधीही न पाहिलेले नुकसान सहन करावे लागेल.’ खामेनींच्या या प्रतिक्रियेनंतर, त्यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे कयान वृत्तपत्राचे संपादक हुसेन शरीयतमदारी यांनी त्या ठिकाणांची यादीही दिली आहे. त्यामुळे ते सध्या इराणच्या लक्ष्यावर आहेत.

हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सज्ज
हुसेन शरीयतमदारी यांनी कयहान वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘आता विलंब न करता कारवाई करण्याची आपली वेळ आहे. पहिले पाऊल म्हणजे बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला करणे आणि त्याच वेळी अमेरिकन, ब्रिटिश, जर्मन आणि फ्रेंच जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणे.’

दोन्ही ठिकाणे महत्त्वाची का आहेत?
अमेरिकन नौदलाचा पाचवा फ्लीट बहरीनची राजधानी मनामा येथे आहे. हा फ्लीट संपूर्ण मध्य पूर्व, पर्शियन आखात, लाल समुद्र आणि अरबी समुद्रातील अमेरिकन नौदल ऑपरेशन्सवर लक्ष ठेवतो. हा एक आखाती देश आहे, जो पर्शियन आखातात स्थित आहे आणि अमेरिकेसाठी धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे. अशा परिस्थितीत, जर इराणने येथे क्षेपणास्त्र हल्ला केला तर तो थेट अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करेल. इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्स चॅनेलने असेही म्हटले आहे की अमेरिकेने शिक्षेची वाट पहावी कारण आता अमेरिकन नागरिक आणि सैन्य आपले लक्ष्य असतील.

जर हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली तर काय होईल?
हॉर्मुझची स्ट्रेट फारस आणि ओमानच्या आखातांना जोडते आणि हा जलमार्ग इराण आणि ओमानमध्ये आहे. हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे आणि जगातील 20 टक्के तेल या मार्गावरून जाते. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सच्या नौदल युद्धनौका आणि व्यावसायिक जहाजे या ठिकाणी तैनात आहेत. पाश्चात्य देश सुरक्षेच्या कारणास्तव येथे त्यांची जहाजे तैनात करतात जेणेकरून इराणच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल. जर ते बंद केले तर जगभरातील तेलाच्या किमती वाढण्याबरोबरच एक मोठे आंतरराष्ट्रीय संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.