
इस्रायलने शुक्रवारी इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणचं कंबरड मोडलं. इस्रायलने इराणच्या अणवस्त्र आणि सैन्य तळांवर हल्ले केले. इस्रायलने या कारवाईला ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ नाव दिलं आहे. यात इराणचे दोन बडे लष्करी अधिकारी ठार झाले आहेत. इराणचे अणवस्त्र तळ नष्ट केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलने इराणला हादरवून सोडलय. इराण अणवस्त्र संपन्न देश बनण्याच्या तयारीत असतानाच इस्रायलने त्यांना मोठा धक्का दिला आहे. 13 जून रोजी केलेल्या या हल्ल्यात इराणचे सैन्य प्रमुख, अणवस्त्र वैज्ञानिकांसह अनेक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
इराणला अणवस्त्र संपन्न देश बनू देणार नाही, हे इस्रायल आधीपासून सांगत आहे. हेच त्यांनी आज सिद्ध करुन दाखवलं. इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात इराणने आपल्या दोन खास माणसांना गमावलं. IRGC चीफ ऑफ स्टाफ जनरल होसैन सलामी यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. शुक्रवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात देशातील शक्तीशाली रिवोल्यूशनरी गार्ड्सचे प्रमुख होसैन सलामी यांचा मृत्यू झाला, असं इराणच्या स्थानिक मीडियाने म्हटलं आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात कोणा-कोणाचा मृत्यू?
आयआरजीसी चीफ ऑफ स्टाफ जनरल होसैन सलामी
आयआरजीसी जनरल घोलम-अली रशीद
दोन अणवस्त्र वैज्ञानिक
इराणची बऱ्याच वर्षापासूनची मेहनत वाया
इराण अणवस्त्र तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून मेहनत घेत आहे. आता इराण अणूबॉम्ब बनवण्याच्या जवळ आहे, असं म्हटलं जात होतं. पण इस्रायलला इराणच अणवस्त्र संपन्न बनणं अजिबात मान्य नाही. इस्रायल हा आपल्या अस्तित्वाला धोका मानतो, म्हणून त्यांनी 13 जून रोजी इराणवर हल्ला केला.
इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेले ते दोन वैज्ञानिक कोण?
इस्रायलने इराणच्या अणवस्त्र तळांना लक्ष्य केलं. या तळांचं मोठं नुकसान करण्यात इस्रायल यशस्वी ठरला. या हल्ल्यात इराणच्या दोन अणवस्त्र वैज्ञानिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे इराणच्या अणूबॉम्ब विकसित करण्याच्या कार्यक्रमाला खीळ बसणार आहे. त्यांचा स्पीड कमी होईल. डॉ. मोहम्मद तेहरांची आणि डॉ. फेरेयदून अब्बासी या इराणच्या दोन अणवस्त्र वैज्ञानिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
किती काळ चालणार ऑपरेशन ‘रायजिंग लायन’ ?
हे हल्ले झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं की, ‘काही वेळापूर्वी इस्रायलने ऑपरेशन ‘रायजिंग लायन’ सुरु केलं आहे’ “इस्रायलच्या अस्तित्वाला इराणपासून निर्माण झालेला धोका कमी करण्यासाठी हे एक टार्गेटेड सैन्य ऑपरेशन आहे. हा फक्त एक हल्ला नाही, पुढे सुद्धा असे हल्ले होऊ शकतात. हा धोका संपवण्यासाठी जितके दिवस लागतील, तितका काळ हे ऑपरेशन सुरु राहिलं” असं बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.