टीव्ही शो सुरु असताना इस्रायलने केला भीषण हल्ला, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल
इस्रायलने सीरियातील अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. यातील एक हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

इस्रायलने आपला मोर्चा आता सीरियाकडे वळवला आहे. इस्रायलने सीरियातील अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. या हल्ल्यामुळे दमास्कस शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक ठिकाणी हल्ला झाल्याने आकाशात धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत. या हल्ल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या असे दिसत आहेत एक महिला अँकर टीव्ही चॅनेलवर बातम्या सांगत होती, मात्र हल्ल्यामुळे तिला लाईव्ह कार्यक्रम सोडून पळून जावे लागले. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
इस्रायलने काय म्हटले?
इस्रायलने आज सीरियाचे संरक्षण मंत्रालय आणि लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला. ड्रोन आणि बॉम्बने हा हल्ला करण्यात आला आहे. याबाबत इस्रायलने माहिती देताना म्हटले की, ड्रुझ समाजावर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे. द टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने म्हटले आहे, ‘बुधवारी दमास्कसमधील सीरियन जनरल स्टाफ कमांड इमारतीवर आणि सीरियन राष्ट्रपतीमच्या निवासस्थानाजवळ असलेल्या आणखी एका लष्करी ठिकाणावर हल्ला करण्यात आला आहे.
Dramatic visuals of an Israeli airstrike captured from a news studio in Damascus, Syria a short while ago. pic.twitter.com/H6ox4K1lqq
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) July 16, 2025
आयडीएफने पुढे बोलताना म्हटले की, ‘आम्ही दक्षिण सीरियातील स्वेदा शहराकडे जाणारे सीरियन रणगाडे, रॉकेट लाँचर आणि मशीनगन असलेल्या पिकअप ट्रकच्या मार्गावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीरियाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या आम्ही दक्षिण सीरियातील ड्रुझ समुदायावर लक्ष ठेऊन आहोत.
इस्रायलचा ड्रुझ समाजाला पाठिंबा
इस्रायल ड्रुझ समाजासाठी संपूर्ण सीरियात हल्ले करत आहे. इस्रायल आता गोलान हाइट्समध्ये 2 डिव्हिजन तैनात करण्यास आणि ड्रोन आणि लढाऊ विमानांसह हवाई दल पाठवण्यास सज्ज आहे. हे अतिरिक्त सैन्य सीमेवरील आणि बफर झोनमध्ये असणाऱ्या 210 व्या बाशान डिव्हिजनला आणखी मजबूत करेल. यातून इस्रायल ड्रुझ समुदायाच्या सुरक्षेसाठी कुठलीही तडजोड करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.
नेतान्याहू यांचे ड्रुझ समुदायाला आवाहन
सीरियात यु्द्धजन्य परिस्थिती असल्याने अनेक ड्रुझ समुदायाचे लोक इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. या लोकांना आवाहन करताना इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हटले की, ‘नैऋत्य सीरियामधील परिस्थिती खूप गंभीर आहे. इस्रायली सैन्य या भागात ऑपरेशन करत आहेत. आम्ही ड्रुझ बांधवांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. असे केले तर तुमच्या जीवाला धोका असेल. तुमचा जीवही जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या घरात रहा.’
