इस्त्रायलचा इराणवर हल्ला, अण्वस्त्र केंद्र नष्ट, ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तेहरान हादरले

इस्रायलने इराणच्या डझनभर अण्वस्त्र आणि लष्करी केंद्रावर हल्ले केले आहे. इस्रायली हल्ल्यानंतर इराणने राजधानीच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ इमाम खोमेनी येथील उड्डाणे रद्द केली आहेत.

इस्त्रायलचा इराणवर हल्ला, अण्वस्त्र केंद्र नष्ट, ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तेहरान हादरले
इस्त्रायलने इराणवर हल्ले सुरु केले
| Updated on: Jun 13, 2025 | 7:36 AM

जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करण्याची भीती निर्माण झाली आहे. इस्रायलने इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी प्रचंड हल्ले केले आहेत. इस्रायली सैन्याने इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केला आहे. तसेच इस्रायलने इराणी लष्करी तळांवर आणि अण्वस्त्र तळांवर हल्ला केला आहे. शुक्रवारी सकाळी इस्रायलने इराणवर हल्ला केल्याचे सांगितले. तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज येत असल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी दिले आहे.

इस्रायलने इराणवर हल्ला करत राजधानी तेहरानला लक्ष्य केले. या हल्ल्याने संपूर्ण तेहरान हादरले. या हल्ल्यात इस्रायलने इराणची अण्वस्त्र केंद्रही उद्ध्वस्त केली आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी या हल्ल्याबाबत दावा केला की, इस्रायलने टारगेटिड ऑपरेशन सुरु केले आहे. इराणच्या अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे इराणचे प्रचंड नुकसान झाले आहे. इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलने आपला एअर स्पेस बंद केला आहे. आता ईराणकडून हल्लास प्रत्युत्तर मिळण्याच्या शक्यतेमुळे इस्रायलने आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे.

इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, इस्रायलने इराणच्या डझनभर अण्वस्त्र आणि लष्करी  केंद्रांवर हल्ले केले आहे. इस्रायली हल्ल्यानंतर इराणने राजधानीच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ इमाम खोमेनी येथील उड्डाणे रद्द केली आहेत. कारण तेहरानभोवती मोठे स्फोट ऐकू येत होते, असे द टाईम्स ऑफ इस्रायलने वृत्त दिले आहे.

इराणच्या अणुकार्यक्रमावरून तणाव निर्माण झाला होता. इराण आपला अणुकार्यक्रम जलद गतीने पूर्ण करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. इस्रायलने केलेला हा हल्ला खूप मोठा आहे. कारण या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या अणुस्थळांना उद्ध्वस्त केले आहे. शुक्रवारी पहाटे या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. सर्वत्र धुराचे लोट दिसत होते. इराणने यापूर्वीच म्हटले होते की, इस्रायलकडून हल्ला झाला तर इराण देखील योग्य उत्तर देईल, त्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी म्हटले की, इराण आता प्रत्युत्तर देऊ शकेल. इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने तात्काळ इराण हल्ले करेल अशी अपेक्षा आहे.