
India-maldive raw : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतासोबत पंगा घेणाऱ्या मोहम्मद मुइज्जू यांना त्यांचे पद गमवावे लागू शकते. मालदीवचा मुख्य विरोधी पक्ष एमडीपी आणि त्याच्या मित्र पक्षांनी संसदेत राष्ट्राध्यक्षांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्यास सहमती दर्शविली आहे. मालदीवमधून येत असलेल्या वृत्तानुसार, मालदीव एमडीपी संसदीय गटाने अध्यक्ष मुइज्जू यांच्याविरुद्ध महाभियोग सादर करण्यास सहमती दर्शविली आहे. संसदेत एमडीपीचे बहुमत आहे, त्यामुळे अध्यक्ष मुइज्जू यांना त्यांचे पद वाचवणे फार कठीण दिसतेय.
एमडीपीने डेमोक्रॅट्सच्या भागीदारीत महाभियोग प्रस्तावासाठी पुरेशा स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. एमडीपी खासदाराने सोमवारी दुपारी सांगितले की. मालदीवचा मुख्य विरोधी पक्ष भारत समर्थक आहे आणि त्याला संसदेत बहुमत आहे, त्यामुळे MDP ला राष्ट्रध्यक्षांविरुद्ध महाभियोग आणणे खूप सोपे मानले जात आहे. मुइज्जू यांची खुर्ची आता धोक्यात आली आहे. मालदीवच्या राजकारणात ही नवीन घडामोड आली आहे. मालदीवच्या संसदेत चीन समर्थक अध्यक्ष मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळातील चार सदस्यांना मंजुरी देण्यावरून मतभेदांवरून सरकार समर्थक खासदार आणि विरोधी खासदारांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर आला आहे.
प्रमुख विरोधी पक्ष MDP ने मंत्रिमंडळावर मतदान करण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या मंत्रिमंडळाच्या चार सदस्यांना संसदीय मान्यता रोखण्याचा निर्णय घेतला. यानंतर सरकार समर्थक खासदारांनी संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणत निषेध करण्यास सुरुवात केली. खासदार अब्दुल्ला शहीम आणि खासदार अहमद इसा यांच्यात वाद झाला. हाणामारीत दोन्ही खासदार चेंबरजवळ पडले, त्यामुळे शाहीम यांच्या डोक्यालाही दुखापत झाली. अल्पसंख्याक नेते मुसा सिराज यांनी वाद थांबवण्याचा प्रयत्न केला होता.
मालदीवच्या संसदेत 87 जागा आहेत, त्यापैकी प्रमुख भारत समर्थक विरोधी पक्ष एमडीपीकडे 43 जागा आहेत, तर त्यांचा सहयोगी डेमोक्रॅटिक पक्षाकडे 13 जागा आहेत. या दोघांची युती झाली असून त्यांच्याकडे एकूण 56 जागा आहेत. याशिवाय, मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्षांविरुद्ध महाभियोग आणण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि महाभियोग आणण्यासाठी संसदेत केवळ 56 मतांची आवश्यकता आहे, जी या दोन्ही पक्षांकडे आहे. संसदेत अद्याप महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आलेला नसला तरी त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. अशा स्थितीत संसदेत महाभियोग प्रस्ताव मांडला गेला तर मोहम्मद मुइज्जू यांचे अध्यक्षपद गमवावे लागेल.