US Iran War : अंत्यसंस्कार सुरू, अन् इराणभर स्फोटांची मालिका; ट्रम्प यांनी लगेच फोन फिरवत…

US Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यातील तीव्र संघर्ष पुन्हा सुरू झालाय. बुशेरसह इराणमधील अनेक शहरांमध्ये स्फोट झाले आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही नवीन हल्ल्याचा इन्कार केला आहे. त्यांनी तातडीने फोन फिरवत मोठ्या नेत्याशी चर्चा केली.

US Iran War : अंत्यसंस्कार सुरू, अन् इराणभर स्फोटांची मालिका;  ट्रम्प यांनी लगेच फोन फिरवत...
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Jul 10, 2026 | 8:51 AM

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी हजारो लोक जमले होते. त्यांच्या मुलाने, मुस्तफा खामेनीने प्रार्थना केली. मात्र यावेळी नवीन सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी तेथे उपस्थित नव्हते. अयातुल्ला खामेनी यांच्या अंत्यसंस्कारच्या वेळेस अनेकांना अश्रू अनावर झाले. एकीकेड दफनविधी सुरू असतानाच इराणमधील अनेक शहरं पुन्हा धमाक्यांनी हादरली. इराणमधील अनेक शहरांमध्ये जोरदार स्फोट झाले असून बॉम्बस्फोटांमुळे बुशेर शहराचे प्रचंड नुकसान झालं. मात्र आपण कोणतेही नवीन हल्ले केलेले नाहीत असं सांगत अमेरिकेने हल्ल्यांची जबाबदारी फेटाळून लावली.

अनेक शहरं उद्ध्वस्त

इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बुशेहर, कोनारक, चाबहार आणि बंदर अब्बास या शहरांमध्ये स्फोट झाले. ‘मेहर न्यूज एजन्सी’ने दिलेल्या माहितीनुसार, कोनारक शहरात तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. याव्यतिरिक्त, बुशेहर आणि चोघाडक येथूनही स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तरी या स्फोटांच्या कारणांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

तसेच हे स्फोट नेमके कोणी घडवले, हल्ले कोणी केले हेही स्पष्ट झालेलं नाही. हे स्फोट हल्ल्यांमुळे झाले, सैन्याने कारवाई केली की अजून काही कारणांमुळे झाले याची माहितीदेखील अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मात्र, या स्फोटांचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्फोटांचे कारण किंवा संभाव्य हल्ला यांबाबत कोणत्याही बाजूकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

ट्रम्प – नेतन्याहू यांची फोनवरून चर्चा

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्य्क्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतनयाहू यांची फोनवरून चर्चा झाल्याचे समजते. “पंतप्रधान नेतान्याहू आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज संध्याकाळी पुन्हा एकदा दूरध्वनीवरून चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, विविध क्षेत्रांत आपापल्या देशांमध्ये निकटचा समन्वय राखण्यावर त्यांनी सहमती दर्शवली. आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या अलीकडील घडामोडींची माहिती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधानांना दिली.” असं पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

इराणच्या 8 जवानांचा मृत्यू

दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणचे आठ सैनिक मारले गेल्याचा दावा आहे. ‘आयआरजीसी’शी (IRGC) संलग्न असलेल्या ‘फार्स न्यूज एजन्सी’ने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या हवाई दलातील आणि नौदलातील एकूण आठ सैनिक ठार झाले.

 

Follow Us