Iran US Operation : ग्राऊंड ऑपरेशन धक्का तंत्र असेल, अमेरिका-इस्रायल आधी या फौजा आत घुसतील, त्यांची इराणशी जुनी दुश्मनी
Iran US Operation : अमेरिका-इस्रायलच इराण विरोधात ग्राऊंड ऑपरेशन एक सरप्राइज असेल. इराणला वाटतय की खार्ग बेटावर किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये अमेरिकन सैन्य हल्ला करेल. पण त्यांच्याआधी दुसरेच हल्ला करतील. अमेरिका-इस्रायलकडून अजून पर्यंत हवाई हल्ले सुरु आहेत.

अमेरिका-इस्रायलने इराण विरोधात सुरु केलेल्या युद्धाला आता महिना उलटला आहे. हे युद्ध सुरु करताना अमेरिका-इस्रायलचे जे अंदाज होते, ते सर्व चुकले. अमेरिका-इस्रायलला वाटलेलं की, हवाई हल्ले केल्यानंतर इराणी जनता रस्त्यावर उतरुन तिथली सत्ता आपल्या ताब्यात घेईल. पण असं काहीही घडलेलं नाही. त्यामुळे हे युद्ध अजून किती काळ चालेल हे सांगता येत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराण बरोबर सकारात्मक चर्चा सुरु असल्याचं वारंवार सांगत आहेत. पण इराणने हे दावे सतत फेटाळून लावले आहेत. त्यामुळे खरं कोण बोलतय आणि खोटं कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान आता अमेरिका इराणमध्ये जमिनी कारवाई सुरु करणार अशी चर्चा आहे. अमेरिका-इस्रायलकडून अजून पर्यंत हवाई हल्ले सुरु आहेत. पण आता दोन्ही देशांचं सैन्य ग्राऊंड ऑपरेशन सुरु करणार असल्याची माहिती आहे.
अमेरिकेने जमिनी हल्ला केला तर त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इराणकडून दम भरला जात आहे. अमेरिकेकडून स्ट्रेट ऑफ हॉर्मुज किंवा खार्ग बेट येथे जमिनी हल्ल्याची कारवाई केली जाईल असा अंदाज आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज यासाठी कारण इराणने इथे जलवाहतुकीची कोंडी करुन ठेवली आहे आणि खार्ग यासाठी कारण इथून इराणचं जवळपास 90 टक्के तेल निर्यात होते. बहुतांश रणनितीक एक्सपर्ट्सचा हा अंदाज चुकू शकतो. कारण अमेरिका-इस्रायल ग्राऊंड ऑपरेशनमध्ये धक्का तंत्राचा वापर करु शकतात.
इराणला घेरण्याची योजना बनवत आहेत का?
कुर्दीश लोकांची जी कुर्द फोर्स आहे, ती अमेरिका-इस्रायलआधी इराणवर हल्ला करु शकते. आता प्रश्न हा आहे की, हा हल्ला अमेरिकेच्या ग्राऊंड ऑपरेशन आधी होईल का?. इस्रायल, अमेरिका आणि कुर्द तिन्ही बाजूंनी मिळून इराणला घेरण्याची योजना बनवत आहेत का?. हे असे काही प्रश्न आहेत. शनिवारी सकाळी इराकच्या कुर्दिस्तान क्षेत्राचे राष्ट्रपती नेचिरवान बारजानी यांच्या घरावर ड्रोन हल्ला झाला. इराकच्या एरबिलमध्ये कुर्द शासक पार्टीचे नेते मसूद बारजानी यांच्या निवासस्थानाजवळ एअर डिफेन्स प्रणालीने एक ड्रोन पाडलं.
दीर्घकाळापासून इराणमध्ये आपल्या अधिकारांसाठी लढा देत आहेत
कुर्द एक जातीय समूह असून ते इराक, इराण, तुर्की आणि सीरियामध्ये वास्तव्याला आहेत. इराणमध्ये सुद्धा लाखो कुर्द लोक राहतात. पण इराण सरकारने त्यांना संपूर्ण अधिकार दिलेले नाहीत. कुर्द लोक दीर्घकाळापासून इराणमध्ये आपल्या अधिकारांसाठी लढा देत आहेत. त्यांचे अनेक गट जसं की, पीडीकेआय, पीएके आणि कोमाला पार्टी इराणच्या सीमेजवळ इराकच्या कुर्द क्षेत्रात लपले आहेत.
खूप शूर मानले जातात
तुर्की, इराक, सीरिया, इराण आणि आर्मेनियाच्या सीमावर्ती भागातील डोंगराळ क्षेत्रात 3 कोटीपेक्षा अधिक कुर्द लोक वास्तव्याला आहेत. मध्य पूर्वेतील ते चौथा मोठा जातीय समूह आहेत. पण त्यांना कधीही एका देशाचा दर्जा मिळाला नाही. पेशमर्गा म्हणून ओळखले जाणारे हे कुर्द खूप शूर मानले जातात. अनेक वर्षांपासून ते इराण सरकारविरोधात लढत आहेत. आता या युद्धात कुर्द गट अमेरिका आणि इस्रायलच्या मदतीने इराणच्या आत घुसण्याचा विचार करत आहे. इराणी सैन्याला कमकुवत असून इराणमध्ये अंतर्गत विद्रोह घडवून आणणं हा त्याचा उद्देश आहे. जेणेकरुन इराणमध्ये इस्लामिक रिपब्लिक शासन कोसळावं.