भारतीय पर्यटकांसाठी मोठा निर्णय! ‘या’ देशाने बंद केली Visa-Free एन्ट्री; अर्जात चूक झाल्यास भरलेले पैसेही परत मिळणार नाहीत
एका आशियाई देशाने भारतीयांसाठी असलेली 30 दिवसांची 'व्हिसा-फ्री-एन्ट्री' बंद करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2017 पासून लागू होईल. कोणता आहे देश जाणून घ्या.

परदेशात फिरायला जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीयांना ३० दिवसांचा व्हिसामुक्त प्रवेश देणाऱ्या मलेशियाने आता या सुविधेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२७ पासून भारतीय नागरिकांना मलेशियात जाण्यासाठी आधीच व्हिसा घेणे बंधनकारक असणार आहे. मलेशियाच्या इमिग्रेशन विभागाने १७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात अधिकृत सूचना जारी केली आहे. नव्या नियमानुसार १ डिसेंबर २०२६ पासून व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
१ जानेवारीपासून बदलणार प्रवेशाचे नियम!
आतापर्यंत भारतीय नागरिकांना मलेशियात पर्यटनासाठी ३० दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय राहण्याची परवानगी होती. ही सुविधा १ डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्यात आली होती आणि २०२६ च्या अखेरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, आता ही सवलत संपुष्टात येणार आहे. नव्या नियमानुसार १ जानेवारी २०२७ किंवा त्यानंतर मलेशियाला जाणाऱ्या भारतीयांना प्रवासापूर्वी वैध व्हिसा मिळवावा लागेल. यासाठी मलेशियाच्या ‘MyVISA’ पोर्टलवरून अर्ज करता येईल.
अर्जात चूक झाली तर पैसे बुडणार!
नव्या नियमांमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्हिसा अर्जासाठी भरलेले शुल्क परत मिळणार नाही. अर्जामध्ये चुकीची माहिती दिली, आवश्यक कागदपत्रे अपूर्ण राहिली, व्हिसा नाकारला गेला किंवा प्रवासाचा प्लॅन बदलला, तरी अर्जदाराला भरलेली फी परत मिळणार नाही.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पासपोर्टची माहिती, प्रवासाच्या तारखा आणि आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासणे गरजेचे आहे.
फर्जी नोकरीच्या आमिषामुळे निर्णय?
मलेशियाने हा निर्णय घेण्यामागे व्हिसामुक्त प्रवेशाचा गैरवापर हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये क्वालालंपूर येथील भारतीय उच्चायुक्तालयाने भारतीय नागरिकांसाठी सावधगिरीची सूचना जारी केली होती. काही भारतीय नागरिक बनावट नोकरीच्या ऑफर आणि एजंटांच्या आमिषाला बळी पडून मलेशियात पोहोचत असल्याचे निदर्शनास आले होते. व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा केवळ पर्यटन आणि सामाजिक भेटींसाठी होती. त्याचा वापर नोकरी शोधण्यासाठी किंवा काम करण्यासाठी करता येत नाही, असेही उच्चायुक्तालयाने स्पष्ट केले होते.
प्रवासापूर्वी मेडिकल इन्शुरन्स आवश्यक
मलेशियात जाणाऱ्या पर्यटकांनी संपूर्ण प्रवासाच्या कालावधीसाठी ट्रॅव्हल मेडिकल इन्शुरन्स घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. परदेशी नागरिकांना तेथील वैद्यकीय उपचारांचा खर्च स्वतः करावा लागू शकतो. त्यामुळे अचानक आजारपण किंवा अपघात झाल्यास आर्थिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विमा घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पर्यटकांनी काय काळजी घ्यावी?
नवीन वर्षात मलेशियाला जाण्याचा विचार करत असाल, तर प्रवासाच्या तारखेनुसार व्हिसाचे नियम तपासा. 1 जानेवारी 2017 नंतरच्या प्रवासासाठी 1 डिसेंबरपासून व्हिसा अर्ज करता येईल. तसेच बनावट नोकरीच्या ऑफर देणाऱ्या एजंटांपासून सावध राहा आणि तिकीट बुक करण्यापूर्वी मलेशियाच्या अधिकृत इमिग्रेशन वेबसाइटवरून नवीन नियमांची खात्री करा.
थोडक्यात, मलेशियाची सहल आता पूर्वीइतकी सोपी राहणार नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान आणि प्रवासातील अडचणी टाळण्यासाठी आधीच योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.