
Mojtaba Khamenei In Russia : इराण-इस्रायल आणि अमेरिकेचं सध्या युद्ध सुरू आहे. हे युद्ध वरवरचं पाहता या तीन देशातील आहे. पण प्रत्यक्षात हे युद्ध अमेरिका विरुद्ध चीन आणि अमेरिका विरुद्ध रशिया असं चालू असल्याचं दिसतंय. कारण चीन आणि रशिया हे दोन्ही देश पडद्यामागून मोठ्या भूमिका निभावतना दिसत आहे. तर, दुसरीकडे इराणला नेस्तानाबूत करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू हे हात धुवून मागे लागले आहेत. मोजतबा खामेनी यांना निष्प्रभ करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल जंगजंग पछाडत आहेत. एवढेच नव्हे तर एका हल्ल्यात मोजतबा गंभीर जखमी झाले. त्यानंतर ट्रम्प यांनीच मोजतबा जिवंत असल्याचं सांगितलं. गंभीर जखमी असल्याचं सांगितलं. आज मात्र, मोजतबा जिवंत आहे की नाही हे सांगता येत नाही असं ट्रम्प सांगत आहेत. मात्र, कुवेतमधील वर्तमानपत्रांचे दावे पाहिले तर ट्रम्प आणि नेतन्याहू यांचा मोठा गेम झाल्याचं समोर येत आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या नाकावर टिच्चून युद्धात नसलेल्या रशियाने मोठा गेम केल्याचं उघड झालं आहे.
कुवेतच्या अल जरीदा या वर्तमानपत्रांच्या दाव्यानुसार मोजतबा खामेनी इराणमध्ये नाहीये. बरं एवढं सांगून अल जरीदा हे वर्तमानपत्र थांबलेलं नाही. अल जरीदाने केलेला एक मोठा दावा तर जगाला थक्क करणारा आहे. एवढेच नव्हे तर ट्रम्प आणि नेतन्याहू यांना मोठा धक्का देणारा आहे. सुप्रीम लीडर मोजतबा यांना प्रकृती आणि सुरक्षेच्या कारणास्तव एका अत्यंत गुप्त अभियानाद्वारे रशियाला नेण्यात आलं आहे. या वृत्तपत्राच्या दाव्यानुसार, मोजतबा यांना रशियाच्या लष्करी विमानाने मॉस्कोला नेण्यात आलं आहे. मॉस्कोत त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. तसेच त्यांच्या सुरक्षेची चिंताही होती. त्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आल्याचा दावा, या वृत्तपत्राने केला आहे.
दरम्यान, वृत्तपत्राच्या या दाव्याची कुणीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. वृत्तानुसार, नुकत्याच झालेल्या हल्ल्यात मोजतबा यांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. इराणी अधिकाऱ्यांच्या मते, मोजतबा सुरक्षित आहेत. आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, वृत्तपत्राने केलेल्या दाव्यामुळे जग हादरून गेलं आहे. ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या नाकावर टिच्चून जगाला थांगपत्ता न लागू देता रशियाने मोठाच गेम केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मॉस्कोला कसे पोहोचले?
रिपोर्टमधील दाव्यानुसार, गुरुवारीच रशियाच्या लष्करी विमानाने मोजतबा यांना मॉस्कोला आणले. त्यांना राष्ट्रपती भवनातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बॉम्बचा वर्षाव आणि हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोजतबा यांचा उपचार करणं अशक्य होतं. त्यामुळेच त्यांना इराणच्या बाहेर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, पुतिन यांनीच मोजतबा यांना रशियात आश्रय देण्याची ऑफर दिली. त्यानंतर मोजतबा मॉस्कोत आले. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. इराणी सेक्युरिटी एजन्सींना मोजतबा यांचं लोकेशन लीक होण्याची भीती होती. त्यामुळे त्यांनीही मोजतबा यांना मॉस्कोला नेण्यास परवानगी दिली. पुतीन यांनीच इराणचे राष्ट्रपती मसूद पजेश्कियन यांच्याशी चर्चा करून मोजतबा यांना रशियाला नेण्याचा प्रस्ताव दिल्याचा दावाही केला जात आहे.
ट्रम्प अजूनही अंधारात
दरम्यान, मोजतबा यांच्याबाबत ट्रम्प अजूनही अंधारातच असल्याचं सांगितलं जात आहे. मोजतबा जिवंत आहे की नाही मला माहीत नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मोजतबा जखमी झाल्याच्या बातम्या आल्यानंतर ट्रम्प यांनी हे विदान केलं होतं. एनबीसी न्यूजशी बोलताना ट्रम्प यांनी हे विदान केलं. ते जिवंत आहेत की नाही माहीत नाही. कुणीच आतापर्यंत त्यांना दाखवलं नाही. पण मला जे ऐकायला येतंय त्यानुसार मोजतबा जिवंत नाहीये. जर ते जिवंत असतील तर देशासाठी त्यांनी समजूतदारपणा दाखवून आत्मसमर्पण केलं पाहिजे, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.