Nepal Flood: भूकंप, पाऊस की हिमस्खलन.. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराचं खरं कारण समोर

Nepal Flood: नेपाळमधील विनाशकारी पुरासाठी भूकंप, हिमस्खलन आणि मुसळधार पाऊस यांसारखी अनेक कारणं सांगितली जात आहेत. या पुरामुळे फक्त नेपाळमध्येच विध्वंस झाला नाही, तर भारतातही चिंता वाढली आहे.

Nepal Flood: भूकंप, पाऊस की हिमस्खलन.. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराचं खरं कारण समोर
नेपाळमध्ये पूर
Image Credit source: Tv9
| Updated on: Aug 27, 2026 | 9:25 AM

Nepal Flood: तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे बुधवारी मध्य नेपाळमध्ये हाहाकार उडाला. या पुरामुळे जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला असून 750 पेक्षा अधिक जण बेपत्ता झाले आहेत. त्यामध्ये 133 भारतीय आणि 37 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. सुरुवातीला या महापुरामागे मुसळधार पाऊस किंवा भूकंपाचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, आता प्राथमिक वैज्ञानिक विश्लेषणातून या नैसर्गिक आपत्तीमागचं वेगळंच कारण समोर आलं आहे. तिबेट-नेपाळच्या सीमाभागात भूकंप होऊन हिमस्खलन झालं. बर्फाचे मोठे खडक नेपाळच्या लेंडे खोला नदीत आदळून पूर आला. ही भोटे कोशी नदीची उपनदी असल्याने या नदीलाही पूर येऊन नेपाळमधील अनेक गावं, खेडी अक्षरश: उद्ध्वस्त झाली.

काठमांडूपासून सुमारे 40 मैल उत्तरेला असलेल्या हिमालयीन भागात ही घटना घडल्याचं प्राथमिक विश्लेषण सांगतंय. सॅटेलाइट प्रतिमांनुसार, सुमारे 2,000 फूट रुंदीचा बर्फाचा मोठा भाग सुमारे 17,000 फूट उंचीवरून तुटून जवळपास 4,000 फूट खाली घाटीत कोसळला. या प्रचंड वेगाने खाली आलेल्या बर्फामुळे मोठ्या प्रमाणात बर्फ, दगड आणि मातीचा मलबा तयार झाला. तज्ज्ञांच्या मते, या घटनेमुळे नदीच्या प्रवाहात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा मिसळला. काही प्राथमिक अहवालांनुसार, या मलब्यामुळे नदीचा मार्ग काही काळासाठी अडला आणि त्यानंतर तयार झालेला तात्पुरता जलसाठा अचानक फुटल्याने महापुराचा वेग आणखी वाढला असण्याची शक्यता आहे.

भूकंपामुळे पूर आला का?

घटना घडल्यानंतर परिसरात भूकंपासारखा सिस्मिक सिग्नल नोंदवला गेला होता. सुरुवातीला 4.4 तीव्रतेच्या भूकंपामुळे हिमनदीचा भाग तुटला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, अमेरिकेच्या USGSच्या डेटानुसार हा सिग्नल प्रत्यक्ष भूकंपाऐवजी प्रचंड भूस्खलनामुळे निर्माण झालेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूकंप हा या आपत्तीचा मूळ कारण होता का, याचा तपास अद्याप सुरू आहे.

हवामान बदलाचाही संबंध?

तज्ज्ञांनी या घटनेचा संबंध हिमालयातील वाढत्या तापमानाशीही जोडला आहे. सॅटेलाइट डेटामध्ये दुर्घटनेच्या आदल्या दिवशी परिसरातील बर्फाचं आवरण झपाट्याने कमी झाल्याचे संकेत दिसत असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे वाढत्या तापमानामुळे हिमनदी अस्थिर झाली असण्याची शक्यता तपासली जात आहे. मात्र, या निष्कर्षासाठी आणखी सविस्तर वैज्ञानिक तपासणी आवश्यक आहे.

पुरामुळे पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. अनेक रस्ते, पूल वाहून गेले. तसंच दहापेक्षा अधिक जलविद्युत प्रकल्पांचं नुकसान झालं. पुरामुळे मोठ्या प्रमाणात चिखल वाहून आला. तिबेटमध्ये पर्वतावरील चिखल खाली आल्याने तिघांचा मृत्यू तर 265 जण बेपत्ता झाले.

Follow Us