अखेर भीती खरी ठरली! नेपाळ-तिबेट सीमेवरील सरोवर फुटलं; बिहारमध्ये हायअलर्ट

नेपाळमध्ये ग्लेशियर सरोवर फुटल्याने बिहारमध्ये हायअलर्ट जारी झाला आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बिहार सरकारने गंडक आणि कोसी बराजसह सर्व महत्त्वाच्या तटबंधांची 24 तास निगराणी वाढवली आहे. अभियंत्यांची विशेष टीम तैनात असून, पाण्याची पातळी नियंत्रित ठेवली जात आहे. उपमुख्यमंत्री विजय कुमार चौधरी यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.

अखेर भीती खरी ठरली! नेपाळ-तिबेट सीमेवरील सरोवर फुटलं; बिहारमध्ये हायअलर्ट
Nepal glacial lake burst
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2026 | 1:54 PM

निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करणाऱ्या नेपाळच्या मागचं शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाहीये. ज्याची भीती होती तेच आज परत घडलं आहे. नेपाळ-तिबेटच्या सीमेवर बनलेलं आणखी एक ग्लेशियर सरोवर फुटलं आहे. त्यामुळे नेपाळमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पण नेपाळबरोबरच बिहारमध्येही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारमध्ये मोठी आपत्ती येऊ नये म्हणून 24 तासांसाठी इंजीनिअरची टीम तैनात ठेवण्यात आली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी बिहार सरकारच्या आदेशाने गंडक आणि कोसी बराजसहीत उत्तर बिहारच्या सर्व महत्त्वाच्या तटबंधांची 24 तास निगराणी वाढवण्यात आली आहे.

नेपाळच्या नद्यांमधून येणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि गाळ, मातीचा ढिगारा पाहता जल संसाधन विभागाने मुख्यालय स्तरावरील अधिकारी आणि अभियंत्यांची एक विशेष टीम तैनात केली आहे. नेपाळमधून आलेलं पुराचं पाणी कोणत्याही अडथळ्या शिवाय बाहेर काढण्यासाठी गंडक बराजचे सर्व 36 दरवाजे उघडण्यात आले आहेत. अभियंत्याच्या नेतृत्त्वात एक टेक्निकल टीम बराजवर निगराणी देऊन आहे. सारण तटबंधासहीत सर्व संवेदनशील तटबंधाची गस्त वाढवण्यात आली आहे.

वीरपूरमध्ये कोसी बाराजचे 56 पैकी 17 फाटक खोलण्यात आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी कोसी बराजमधून जवळपास 1,44,775 क्यूसेक पाण्याचा डिस्चार्ज नोंदवला जाणार आहे. तथापि, जल संसाधन विभागाच्या नुसार पूर्व आणि पश्चिम या दोन्ही तटबंदी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि स्थिती सामान्य आहे.

अलर्ट मोडवर

जल संसाधन विभागाच्या मुख्यालय स्तरावर प्रत्येक अर्ध्या तासाला नद्यांमध्ये डिस्चार्ज आणि जलस्तर अपडेट केला जात आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात स्वत: तटबंदांची निगराणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, नेपाळची भोटे कोशी नदीतून सुमारे 10 हजार क्यूसेक अतिरिक्त पाणी येण्याची शक्यता आहे. पण याने कोसीच्या मुख्य प्रवाहावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाहीये.

उपमुख्यमंत्री काय म्हणाले?

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार चौधरी यांनी या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. नेपाळमध्ये ग्लेशियर सरोवर फुटल्याने मोठं नुकसान झालं आहे. पण वाल्मिकीनगर बराजपासून त्या केंद्र बिंदूचं अंतर 250 ते 300 किलोमीटर आहे. एवढं मोठं अंतर असल्याने नेपाळमधून वाहून येणाऱ्या पाण्याचा वेग इथपर्यंत येईपर्यंत कमी होतो. गंडक नदीचा जलस्तर पूर्वीपेक्षा कमी आहे. त्यामुळे जे काही अतिरिक्त पाणी आलं तरी त्याने बिहारमध्ये भयावह परिस्थिती निर्माण होणार नाही, असं विजय कुमार चौधीर यांनी सांगितलं.

नेपाळच्या दोन डझन नद्यांचा बिहारला धोका

जल विशेषज्ञांच्या मते, नेपाळच्या डोंगरखोऱ्यातून निघणारी गंडक, त्रिशूली, भोटेकोशी, सिकरहना आणि नारायणी सारख्या दोन डझनहून अधिक नद्या बिहारच्या पश्चिम चंपारण, गोपालगंज, सारण, मुजफ्फरफूर आणि बेगुसरायसाठी नेहमीच संवदेनशील राहिल्या आहेत. नेपाळमध्ये 10 हून अधिक बर्स्ट आऊट लेक आहेत. त्यावरील अवरोधक तुटल्याने जलप्रलयासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. वर्ष 2017मध्ये सिकरहना आणि त्याच्या सहायक नद्यांमुळे उत्तर बिहारमध्ये पूर येऊन मोठा हाहाकार उडाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर बिहार प्रशासन कोणत्याही आपत्तीपासून बचाव करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

Follow Us