म्यानमारमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय इंजिनिअर्स, डॉक्टरांचे पथक

म्यानमारमधील भूकंपानंतर भारताने 'ऑपरेशन ब्रह्मा' अंतर्गत मदतीत वाढ केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून भारतीय अभियंत्यांच्या पथकाने मंडाले आणि राजधानी नेपिडोमधील भूकंपग्रस्त भागाची पाहणी केली. भारतातील वैद्यकीय पथकाने नेपिडो येथील रुग्णालयात ऑर्थोपेडिस्टसह 70 जखमींवर उपचार केले.

म्यानमारमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय इंजिनिअर्स, डॉक्टरांचे पथक
Operation Brahma
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 17, 2025 | 11:50 AM

म्यानमारमध्ये 28 मार्च रोजी 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर हाहाकार माजला. यावेळी भारताने मदतीसाठी हात पुढे केला. भारताने शोध, बचाव, मदत साहित्य आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू केले. या मदतीत भारताने आतापर्यंत 6 विमाने आणि पाच नौदलाच्या जहाजांद्वारे 625 टन मदत सामग्री पाठवली आहे. तसेच भारतीय इंजिनिअर्स आणि डॉक्टरांचे पथक देखील त्यांच्या मदतीला तळ ठोकून आहे.

म्यानमारमधील भूकंपानंतर भारताने ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत मदतीत वाढ केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून भारतीय अभियंत्यांच्या पथकाने मंडाले आणि राजधानी नेपिडोमधील भूकंपग्रस्त भागाची पाहणी केली. भारतातील वैद्यकीय पथकाने नेपिडो येथील रुग्णालयात ऑर्थोपेडिस्टसह 70 जखमींवर उपचार केले.

यंगून येथील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितले की, ऑपरेशन ब्रह्मा वाढवत आमच्या अभियांत्रिकी पथकाने मंडालेमधील सहा आणि नेपिडोमधील सहा प्रभावित ठिकाणांची पाहणी केली. तसेच, आमच्या वैद्यकीय पथकातील ऑर्थोपेडिक सर्जनांनी नेपिडो रुग्णालयात 70 जखमींवर उपचार करण्यास मदत केली.”

तत्पूर्वी, म्यानमारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मो आंग यांनी भारताचे राजदूत अभय ठाकूर यांची भेट घेऊन भारताच्या तत्पर मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. सुरक्षा आणि द्विपक्षीय सहकार्यावरही दोघांमध्ये चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी म्यानमारचे पंतप्रधान आणि राज्य प्रशासन परिषदेचे अध्यक्ष सीनियर जनरल मिन आंग ह्लाइंग यांनी भारताच्या फिल्ड हॉस्पिटलला भेट दिली, जिथे आतापर्यंत 800 हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

म्यानमारमध्ये 28 मार्च रोजी 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर भारताने शोध, बचाव, मदत साहित्य आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू केले. या मदतीत भारताने आतापर्यंत सहा विमाने आणि पाच नौदलाच्या जहाजांद्वारे 625 टन मदत सामग्री पाठवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मिन आंग ह्लाइंग यांना भारताच्या संवेदना आणि मदतीचे आश्वासन दिले आहे. बँकॉक येथे 4 एप्रिल रोजी होणाऱ्या बिमस्टेक परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.

त्यानंतर 5 एप्रिल रोजी भारताने आयएनएस घारियालच्या माध्यमातून म्यानमारला अतिरिक्त 442 टन खाद्यपदार्थ (तांदूळ, तेल, नूडल्स आणि बिस्किटे) पाठवले. म्यानमारचे यंगूनचे मुख्यमंत्री यू सो थीन यांना थिलावा बंदरात हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. भारतीय दूतावासाने सांगितले की, भूकंपग्रस्तांच्या गरजा पूर्ण करताना भारताने म्यानमारला मोठ्या प्रमाणात अन्नसाहाय्य पाठवले आहे.

ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत आयएनएस सातपुडा आणि आयएनएस सावित्री या जहाजांद्वारे देण्यात आलेली 50 टन मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण साहित्य काल यांगूनमध्ये म्यानमारच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. म्यानमारमधील भारताचे राजदूत अभय ठाकूर यांनी मदत साहित्य सादर केले.